चित्रपटांच्या ‘शुटिंग’साठी पुण्यातील बंगले वेटिंग लिस्टवर

0

मराठी सिनेमांची वाढती संख्या पाहता आता शूटिंगसाठी सातारा, कोल्हापूर, मुंबई याप्रमाणे पुणे शहराचाही प्राधान्यानं विचार होऊ लागला आहे.

आता तर पुण्यातील जुन्या आणि नव्या-कोऱ्या बंगल्यांना शूटिंगसाठी पसंती मिळते आहे. मुख्य शहराप्रमाणे कोरेगाव पार्क, कोंढवा, कॅम्प, खडकवासला, पानशेत, औंध, बालेवाडी, पौड फाटा इथले बंगले शूटिंगसाठी ‘हिट’लिस्टवर आहेत. इतर शूटिंग पुण्याबाहेर होत असलं, तरी बंगला पुण्यातलाच हवा अशी आग्रही मागणीही होते.

बंगल्याचं सुंदर लोकेशन, त्याच्या आजूबाजूचं वातावरण, बंगला मालकांशी मैत्रीपूर्ण संबंध, त्यांची मदतीची तयारी, आपली मालमत्ता शूटिंगसाठी देण्याची वाढती मानसिकता अशी अनेक कारणं यामागे आहेत. पुण्यातील जयकर व्हिला (भांडारकर इन्स्टिट्यूट), राजपूत बंगला (पानशेत रस्ता), रानडे बंगला (प्रभात रस्ता), बोके बंगला (खडकवासला), षड्ज बंगला (सहजानंद), मानस लेक (भूगांव), अमलताश (खडकवासला), गुडविल आणि सिंध सोसायटी (औंध), कुमार बंगला(पौड फाटा) आदींना सध्या सिनेमा शूटिंगसाठी विशेष मागणी आहे. या बंगल्यामध्ये आत्तापर्यंत मोठ्या हिंदी- मराठी सिनेमांचं शूटिंग झालं असून, या यादीमध्ये दिवसेंदिवस भर पडते आहे.

वर उल्लेख केलेल्या बंगल्यांमध्ये ‘रेस्तराँ’, ‘दुनियादारी’, ‘वायझेड’, ‘फॅमिली कट्टा’, ‘वायझेड’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘पितृऋण’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘मुरांबा’ आदी सिनेमांचं शूटिंग झालंय.

सिनेमा किंवा आगामी सिनेमाचे ट्रेलर पाहाताना हे बंगले आवर्जून लक्षात राहतात आणि घर असावं तर असं, याची स्वप्नंही दाखवायला लागतात.

LEAVE A REPLY

*