Type to search

Featured

चिंताजनक वेड

Share

धोका पत्करून हातातील मोबाईलच्या सहाय्याने स्वतःचा फोटो काढताना गेलेल्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकन सायकियाट्रिक सोसायटीने सेल्फीचे वेड म्हणजे मानसिक आजार असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

मानसिकतेचा कळस म्हणजे सेल्फीचे वेड. प्रचंड प्रमाणात सेल्फी घ्यावी असे वाटणे हा ‘सेल्फायटिस’ नावाचा मानसिक आजार आहे, हे आता तज्ञांनी स्पष्ट केले आहे. सेल्फीच्या नादात होणारे अपघात आणि त्यात जीव गमावत असलेली तरुण पिढी हा तर अत्यंत काळजीचा विषय बनला आहे. स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करण्याइतके युवक सेल्फीच्या वेडात आंधळे कसे होतात आणि काहीतरी करून दाखवण्याच्या वयात मृत्यूला का कवटाळतात, या प्रश्नाने सर्वसामान्यांना भंडावून सोडले आहे. तरुण वयात आपले काही बरेवाईट झाले तर आपल्या माघारी घरातील लोकांची परिस्थिती काय होईल, याचाही ते विचार करत नाहीत.

असे धक्कादायक प्रकार सातत्याने आणि मोठ्या संख्येने घडत आहेत. याला बेजबाबदारपणा म्हणायचे की आणखी काय म्हणायचे? अशा बेजबाबदारपणामुळे मुले जाणती होण्याच्या वयातच जगातून नाहीशी होत आहेत. सेल्फीच्या वेडापायी घराघरांत आक्रोश होत आहे.

देशभरात घडत असलेल्या या घटनांना पोलीस आणि प्रशासनही काही अंशी जबाबदार आहे. दरवर्षी अशा घटना घडतात आणि असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. जर प्रशासनाने पहिल्यापासूनच काळजी घेतली तर अनेकांचा जीव वाचू शकतो. घटना घडून गेल्यानंतर सावधगिरीचे उपाय योजून काहीच उपयोग होत नाही. आधीपासून कडक नियमावली अवलंबली असती तर अनेक घटना कदाचित टळल्या असत्या.

देशभरात ठिकठिकाणी अशा घटना वारंवार घडत असतात. परंतु कोणत्याही घटनेतून बोध घेतला जात नाही. किंबहुना कशातूनही बोध घ्यायचाच नाही, अशी समाजाची मानसिकता बनली असावी, असे वाटते.

वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या वृत्तांतांनुसार, 10 जुलै 2017 रोजी नागपूरजवळ सेल्फीच्या नादात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही अशा प्रकारच्या घटना कमी झाल्या नसून त्या उलट वाढतच चालल्या आहेत. अशा घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन प्रशासनाने योग्य पावले उचलायला हवीत.

मानवी जीवन अमूल्य आहे. अनेक घरांमधील एकुलती एक मुलेही सेल्फीच्या वेडापायी जीव गमावून बसली आहेत. जाणूनबुजून चूक करणे अत्यंत चुकीचे असते, असे म्हणतात. हे युवक जर जबाबदारीने वागले असते तर आज हयात असते. जिवाची पर्वा न करता उलट मृत्यूला आमंत्रण देणारे हे कसले सेल्फीवेड? अशा घटनांमध्ये एखाद्याने जीव गमावल्यानंतर दोषी कुणाला ठरवायचे? हा एक यक्ष प्रश्न असून त्याचे उत्तर शोधायलाच हवे.

देशभरात वाढत असलेल्या या घटनांविषयी समाजाला चिंतन करावेच लागेल. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे प्रशासनाचे काम आहे. रेल्वे प्रशासनानेही या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अतिधाडस करणार्‍या युवकांना लगाम घालणे आणि त्यांचे प्राण वाचवणे प्रशासनाला शक्य आहे. अशा मुलांसंदर्भात त्यांच्या पालकांची जबाबदारी मोठी आहे. आपली मुले सेल्फीच्या वेडापायी जीव धोक्यात घालायला तयार होतात, याची दखल घेऊन वेळीच त्यांना समज देणे ही त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी आहे. पण सेल्फीचे कौतुक करण्याच्या नादात पालक मुलांना त्याच्या धोक्यापासून सावध करायला विसरतात.

‘इंडियाज जर्नल ऑफ फॅमिली मेडिसीन अ‍ॅण्ड प्रायमरी केअर’ या अहवालात शार्क माशाच्या हल्ल्यापेक्षा अधिक बळी सेल्फीच्या वेडामुळे गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. शार्क माशाच्या हल्ल्यात वर्षभरात 50 जणांचा मृत्यू झाला, तर सेल्फी काढताना गेलेल्या बळींची संख्या वर्षभरात 259 असल्याचे दाखवून देण्यात आले.

या विषयाला जागतिक परिमाण देण्यासाठी शार्क माशाच्या हल्ल्याचा संदर्भ सेल्फीशी जोडला गेला असावा, असे दिसते. ऑक्टोबर 2011 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत 137 घटनांमध्ये 259 जणांचे बळी केवळ सेल्फीसाठी गेले. यातील सर्वाधिक म्हणजे जवळजवळ निम्मे बळी भारतात गेलेले आहेत, हे गांभीर्याने पाहायला हवे. त्यापाठोपाठ रशिया, अमेरिका आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. जीव गमावलेल्यांचे सरासरी वय 23 असल्याचे दिसून आले असून प्राण गमावणार्‍या तीन व्यक्तींमागे एका तरुणीचा समावेश आहे. सेल्फीचे वेड हा मानसिक आजार असल्याचा निष्कर्ष अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक सोसायटीने काढला असून त्याचीही गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे.

देशातील 80 कोटी लोकांकडे आजमितीस मोबाईल फोन आहे. पूर्वी कॅमेरे अगदी मोजक्या लोकांच्या हातात असत. आज मोबाईलच्या रूपाने प्रत्येकाच्या हाती कॅमेरा आहे. आत्ममग्न युवा पिढी या कॅमेर्‍याशी दोस्ती करत असून ती धोकादायक वळणावर चालली आहे, हे गंभीरपणे जाणून घेतले पाहिजे आणि प्रत्येक स्तरावर हे वेड कमी करण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
डॉ. रोहन जहागिरदार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!