Type to search

धुळे

चाराटंचाईने घेतला गायीचा बळी

Share

कापडणे | पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात दुष्काळाची छाया गडद झाली असून पिकांबरोबरच दिवसेंदिवस चारा व पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. चाराटंचाईमुळे जनावरांची होणारी अवस्था शेतकर्‍यांना अस्वस्थ करणारी आहे. तीव्र चाराटंचाईने येथे एका गायीचा जीव घेतला, पुरेशा चाराअभावी झालेल्या या घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे पुंडलीक उर्फ आबा नारायण पाटील यांचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले.

जनावरांच्या चिंतेने शेतकरी वर्ग कासावीस होत असुन, यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास परिस्थिती भविष्यात अजुन गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेतकरी पुंडलीक उर्फ आबा नारायण पाटील हे शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून गायीचे संगोपान करुन दुध व्यवसाय करतात. दुग्धोत्पादनासाठी असलेल्या गाईसाठी श्री.पाटील यांनी इतर शेतकर्‍याप्रमाणेच आवश्यक चार्‍याची तजबीजही करुन ठेवली, परंतू पावसाचे आगमन तब्बल दीड महिना लांबले आणि येथे चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. दीड-दोन महिन्यापासुन पुंडलीक उर्फ आबा पाटील यांनी विकतचा चारा आणुन गुरे जगविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मध्यप्रदेशातून येणारा महागडा चारा परवडत नसतांनाही तो आतापर्यंत आणला जात होता, परंतू आता तो मिळणेही मुश्कील झाले आहे. म्हणून आहे त्या चार्‍यातच सद्या गुरे जगविण्याची कसरत सुरु आहे. हिरवा चारा तर सद्या औषधालाही नाही, त्यात असलेला कोरडा चाराही अल्पशा प्रमाणात, हातात पैसा नसल्याने इच्छा असुनही ढेप सारखे खादान्न गुरांना देणे परवडत नाही अशा परिस्थितीमुळे या गाईला पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही व परिणामी गाय दगावली. यावेळी गाय अचानक तरफडू लागल्याने आबा पाटील व ज्ञानदीप पाटील या परिवाराने तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले. मात्र, कसोशीने प्रयत्न करुनही गाय दगावली. या घटनेने पाटील परिवाराला मोठा धक्काच बसला. चाराटंचाईने गाईचा जीव घेतल्याने कापडणे परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकरी वर्ग आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे मुक्या जनावरांना जीव लावतो, या पशुधनावर मात्र चांगलच संकट ओढावले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. जीवापाड जपलेल्या या जीवांना मिळेल त्या भावात विकण्याच्या मार्गावर शेतकरी वर्ग आहे. साठवलेला चारा पाऊस लांबल्याने संपला, महागडा चारा आणला तर तोही संपण्यात आला. जनावरांना असं बघण्यापेक्षा त्यांना विकलेलंच बरं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतू सर्वदूर अशीच परिस्थिती असल्याने गुरे घेईल तरी कोण? हा ही प्रश्न आहेच. या परिस्थितीवर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तीव्र चाराटंचाईने येथील गाय दगावल्याने शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!