चांदवडला तुरीचा ट्रक लूटला; आठ जणांवर गुन्हे दाखल

0

चांदवड ता, ७ : शेतकरी संपाच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश दिल्याने बाजारपेठा काहीशा पुर्ववत होत असतांनाच मंगळवार (दि.६) रोजी रात्री लासलगाव-चांदवड महामार्गावर निमगव्हाण येथे  ट्रक अडवून त्यातील तुरीच्या गोण्यांची नासधूस केल्याची घटना घडली. यावेळी टोळक्याने चालकास देखील मारहाण केल्याने ८ आरोपींवर जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास लासलगाव येथील रेल्वे फाटका जवळ ट्रक क्रमांक (एमएच १८ एए ९२५९) ही उभी असतांना मोटारसायकलस्वार दौलत सर्जेराव गांगुर्डे (वय २३) रा. दिघवद ता. चांदवड याने ट्रक चालकाला गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता गाडीत तूर असल्याची माहिती त्याने दिली असता संप सुरू आहे गाडी पुढे  जाऊन बाजूला घे असे धमकावत आपल्या चांदवड, निमगव्हाण येथील साथीदारांना दौलत याने भ्रमणध्वनीद्वारे तूर वाहतूकीबाबत माहिती दिली. दरम्यान ट्रकचा  पाठलाग  करत ती निमगव्हाण येथे अडवत गाडी निमगव्हाण गावात वळविली. तत्पूर्वी रोडवर उपस्थित झालेल्या टोळक्याने चालकास मारहाण करीत गाडीतील तूर डाळीच्या गोण्या खाली फेकण्यास सुरूवात केली. यावेळी गावातील काही संधीसाधू अज्ञातांनी तुरीच्या गोण्या पळविण्याचा प्रयत्न केला. यात ट्रक मधील एकूण ४८० गोण्यांपैकी ८० गोण्या लंपास करण्यात आल्या.
दरम्यानच्या काळात चांदवड पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे पथक घटनास्थळी पोहचल्याने उपस्थित लुटमारांची पळापळ झाली. या धरपकडीत चांदवड पोलिसांनी लंपास झालेल्या गोण्यांपैकी एकूण २० गोण्या जमा करत उर्वरीत मालासह ट्रक चांदवड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर फिर्यादीचे एकूण १ लाख ८० हजारांच्या मालाचे नूकसान झाल्याचे निदर्शनास आल्याने चालक नदीम गुलाम कासीम (रा.धूळे) यांच्या फिर्यादीवरून दौलत सर्जेराव गांगुर्डे,  शांताराम गंगाधर गायकवाड, दीपक बाळकृष्ण दरेकर, समाधान अशोक शिंदे, नामदेव सखाराम जाधव सर्व राहणार (निमगव्हाण) तसेच जितेंद्र विष्णू कोतवाल, सागर (जिमी) रमेश कोतवाल, अनिल महादू कोतवाल सर्व राहणार चांदवड यांच्या विरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, गाडी अडविणे, मारहाण करणे, नूकसान करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी प्रत्येकी १० हजार रूपयांच्या अनामत रक्कमेवर जामिनावर त्यांची मुक्तता केली.

LEAVE A REPLY

*