‘चला रंगवूया नाशिक’सोबत प्रदूषणमुक्तीचा संकल्प

0

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी : नाशिकमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी दैनंदिन कामात सायकलचा वापर वाढवावा, स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिकसोबतच प्रदूषणमुक्त नाशिकसाठी प्रयत्न करावेत, यातून नाशिकची ओळख सायकल वापराची राजधानी म्हणून व्हावी यासाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनकडून विविध विषयांना धरून जनजागृती करण्यात येते आहे.

दैनिक ‘देशदूत’कडून 9 मार्चला ‘चला रंगवूया नाशिक’ उपक्रमांतर्गत शहरातील गंगापूर रोड येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या बाहेरील भिंतीवर विविध विषयांवर नाशिकच्या कलाकारांनी एकत्र येत अनोखी कलाकृती सादर केली. या उपक्रमाने प्रेरीत होऊन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी, सचिव डॉ. मनिषा रौंदळ यांनी उपक्रमाच्या दिवशीच दोन भिंती राखून ठेवल्या होत्या.

ते म्हणाले, आम्ही या दोन भिंतींवर प्रदूषणमुक्त नाशिकचा संदेश देणार असून दैनंदिन जीवनात सायकलीचे महत्त्व आम्ही या कलाकृतीतून दर्शवू इच्छितो. त्यानंतर उपक्रमाच्या दुसर्‍याच दिवशी सायकल फॉर जीम, स्कूल, वर्क, ऑफीस अशी वेगळ्या प्रकारची थीम घेवून त्यांनी दोन्ही भिंतींवर कलाकृती सादर करत येणार्‍या काळात नाशिकची ओळख ही सायकलची राजधानी म्हणून व्हावी यासाठी याठिकाणी एक संदेश देण्यात आला आहे.

चित्र पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या सायकलिस्ट सदस्यांनी सायकलीवरून एकत्र येत नाशिक फॉर सायकलिस्ट कॅपिटल आणि प्रदूषणमुक्त नाशिकचा संकल्प करण्यात आला. यावेळी अविनाश येवलेकर, सतीश महाजन, डॉ. नितीन रौंदळ, प्रतिभा चौधरी, सौरभ नागपुरे, सायली लासलकर, सुचित्रा मोरे, संजय चावला, सायली वडनेरकर, ऋ तूजा कुलकर्णी, नेहा पाटील, दिनकर पाटील, अविनाश दवंगे, सोफीया कपाडीया आदी सायकलिस्टने येथे भेट देत प्रदूषणमुक्त नाशिकचा संकल्प केला.

‘यंग जनरेशन’ला प्रोत्साहन मिळेल : दैनिक ’देशदूत’च्या उपक्रमाचा भाग असलेल्या नाशिक सायकलिस्टच्या अनोख्या चित्रामुळे महाविद्यालयात येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला हे चित्र सायकल वापरासासाठी प्रोत्साहित करेल. या चित्रांमुळे तरुणाईत नक्कीच बदल घडून त्यांचा कल सायकल वापराकडे असेल, अशी भावना अमेरीकेतील रेड अ‍ॅक्रॉस अमेरिका (RAM) स्पर्धेतील विजेते महाजन बंधूंनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*