चंगळवादी संस्कृती आणि मानसिक आरोग्य

0

80टक्के आजार हे मनोकायिक असतात. म्हणूनच मन निरोगी असावे. निरोगी मन शरीर निरोगी राखू शकते. मानसिक आरोग्य म्हणजे जागृत सद्सद्विवेक बुद्धी, शांती व समाधान ‘श्रेयस’ व ‘प्रेयस’ यातील योग्य निवड करण्याचे कार्य जागृत विवेकबुद्धीच करू शकते. तर शांती व समाधानाशिवाय सर्व व्यर्थ आहे. षड्रिूपू व रजतमोगुण यातूनच चंगळवादी मनोवृत्तीचा जन्म होतो व सात्विकता, शांती व समाधानाचा र्‍हास होतो. लवकर मिळणारा पैसा, अति स्वातंत्र्य, स्वार्थीपणा यातून अहंकाराला खतपाणी मिळते. मग ईर्षा, द्वेष, मत्सर, दंभ यांच्या रिंगणात माणूस अडकतो. प्रॅक्टीकॅलिटीच्या नावाखाली तडजोड, त्याग, प्रेम, करुणा, सहृदयता कमी होते आणि दोन व्यक्तींमधील ‘बंध’ नाहीसा होतो. विस्कळीत कुटुंब व्यवस्था, वाढणारे घटस्फोटांचे प्रमाण यातून निर्माण होणारे मनोविकार हेच दर्शवतात.

सुख मिळवण्याच्या चढाओढीत टिकून राहण्यासाठीची धडपड, उद्याची अनिश्चितता, ताण, स्वत:कडून वाढलेल्या अपेक्षा यांनी मन:शांती हरवून गेली आहे. मग उच्चरक्तदाब, डिप्रेशन, मायग्रेन, व्यसनाधीनता निर्माण होते. सुख व दु:ख दोन्ही पेलण्याची ताकद राहिली नाही. म्हणूनच दोन्ही प्रसंगी व्यसनांच्या आहारी माणसे जाताना दिसतात.

आध्यात्मिक आरोग्य :
षड्रिपूंनी भरलेल्या अहंकारी मनात अध्यात्माला जागा नाही. जिथे षड्विकार, रजतमोगुण आहेत तिथे अध्यात्म रुजू शकत नाही. कारण भौतिक सुखाची आसक्ती व परमेश्वराची भक्ती यांचे संबंध व्यस्त प्रमाणात आहेत. केवळ कर्मकांड करणे व आचरणात नीती, धर्माला फाटा देणे याने आध्यात्मिक प्रगती कशी होणार?

सामाजिक आरोग्य
आपण ज्या समाजात राहतो तो समाज सुदृढ हवा. परंतु आज स्वार्थाने बरबटलेल्या समाजाचे विदारक चित्र दिसले. चंगळवादी मनोवृत्तीमुळे भ्रष्टाचार व गुन्हेगारी बोकाळली आहे. ‘भावनांनी बांधलेले ते बांधव’ व अशा बांधवांनी बनतो तो समाज. परंतु आज धर्म, जात, पात, प्रांत असे अनेक भेद, परस्परांविषयी द्वेष याने तो भावनेचा बंध कमकुवत झालाय. आपल्या समाजात सर्व प्रकारचे बांधव असणार, त्यांच्यामध्ये काही त्रुटी असल्या तरी आपल्या समाजाचे घटक म्हणून त्यांच्याविषयी प्रेम, आपुलकी असणे ही भावना समाज एकसंघ ठेवू शकते व सुदृढ समाजच उन्नती करू शकतो. खेकड्याची वृत्ती सोडून आपल्याबरोबर इतरांचे चांगले व्हावे ही भावना हवी. परंतु चंगळवादी मनोवृत्तीमुळे ईर्षा, स्पर्धा, मत्सर यांनी बांधवांची मने कलुषित झाली आहेत. परस्परांविषयी प्रेम, विश्वास, आदर नष्ट होतोय. एकमेकांना मदत करण्यापेक्षा, दुसर्‍याचे हिसकावणे, नुकसान करणे हेच चित्र जास्त दिसते आहे. याने समाज दुर्बल बनतो. दोन मांजरांच्या भांडणात तिसरा माकडच लोणी पळवतो. एक तीळ सात जणात वाटून खाण्याची आपली संस्कृती आहे. पण आज कोट्यवधीच्या मालमत्तेची दोघांत वाटणी करताना कोर्टाची चढावी लागते. मैत्री, प्रेम, विश्वास व त्याग ही चतु:सुत्रीच समाजाला निरोगी बनवू शकेल.

हे सर्व चित्र बदलायचे असेल, आरोग्य संपन्न बनायचे असेल तर आधी चंगळवादी मनोवृत्ती सोडावी लागेल. भगवत् गीतेत शरीराचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात या देहरुपी रथाला दशइंद्रियांचे (पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिये घोडे जुंपले आहेत.) यम-नियम रुपी लगाम बुद्धी या सारथ्याच्या हातात आहेत आणि आत्मा या रथात विराजमान आहे. चंगळ वादामुळे आज इंद्रियांचे लगाम सुटले व मन व इंद्रियरुपी घोडे स्वैर उधळले. अशा परिस्थितीत देहाची काय अवस्था होईल. तेच आज झालेय. म्हणून आता यम-नियमांचे लगाम बुद्धीने आपल्या ताब्यात ठेवले पाहिजेत. तरच धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चारही पुरुषार्थ साधता येतील. या जीवनरुपी प्रवासाचा सुखद आस्वाद घेता येईल. यासाठी गरज आहे ती योग व आयुर्वेदातील आहार, विहार, आचार, क्रिया यांची कास धरण्याची औषधांनी आजार बरे करता येतील, पण आरोग्यासाठी गरज आहे सुयोग्य जीवनशैलीची.
डॉ. प्राजक्ता भांबारे

LEAVE A REPLY

*