घशात अडकल्यासारखे वाटणे

0

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या रोग्यांना असा त्रास लवकर होण्याची शक्यता असते. ज्यांना पोटात अधिक प्रमाणात पित्ताचा (अ‍ॅसिडिटी) त्रास होतो, त्यांच्यामध्ये देखील घशात काहीतरी जाणवते किंवा घशात अटकल्यासारखे वाटते किंवा घशात आग होते. किंवा घसा बंद झाल्यासारखे वाटते. या रुग्णांमध्ये जठरातील पित्त पोटातून छातीच्या भागातील अन्न नलिकेद्वारे घशात येते. त्यामुळे घशात व तोंडात बेचवपणा वाटतो. अथवा कडवटपणा वाटतो. तोंडात थुंकी जास्त प्रमाणात येते. पोटाच्या पित्तविकारामुळे जठररस व जठरातील पदार्थ वर घशाकडे फेकले जातात. त्यामुळे घशावर त्यांचा परिणाम होतो.

अ‍ॅसिडिटी (पित्त) वाढण्याची कारणे
विशेषत: जे अनियमितपणे जेवतात (म्हणजेच जेवणाची वेळ झाल्यावर जेवण न घेता अवेळीच जेवण घेतात अथवा प्रमाण नेहमी आवश्यकतेपेक्षा कमी किंवा अधिक असते.) हॉटेलमधील वा घरीच तयार केलेले चमचमीत पदार्थ विशेषत: अतितिखट व मसाल्याचे निकृष्ट पदार्थ वारंवार खातात. जरूरीपेक्षा नेहमीच जास्त प्रमाणात जेवतात, उपवास जास्त प्रमाणात व वारंवार करतात, उपाशीपोटी शारीरिक वा मानसिक कामे बराच वेळपर्यंत करीत राहतात, चहा जास्त प्रमाणात घेतात. भुकेल्यापोटी पान, चहा, तंबाखू यांचे सेवन करतात, हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण जेवणात कमी ठेवतात, मांसाहार अधिक प्रमाणात घेतात. मानसिक ताण ज्यांच्यामध्ये नेहमीच अधिक असतो, भुकेल्यापोटी मद्य घेतल्यावर लगेच जेवण न घेता उशिरा घेतात. त्यांच्यामध्ये पित्त नेहमी वाढते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झालेल्या पित्ताचा परिणाम घशावर लवकर होतो.

अ‍ॅसिडिटीच्या काही रुग्णांमध्ये घशाच्या त्रासासोबत छातीतही आग होते वा अस्वस्थता वाटते. छातीत काहीतरी दाटून आल्यासारखे अथवा अडकल्यासारखे जाणवते. काहींना छातीत धडधड झाल्यासारखे वाटते. मन व जठर यांचे असंतुलनाने डोके दुखते. जेवणाच्या आधी रोग्याला वाटते की भूक चांगली लागली आहे; परंतु थोडेसे खाल्ल्यावर पोट पूर्ण भरल्यासारखे वाटत असल्यामुळे जेवण नेहमीच अपुरे होते. अपचनाचे प्रमाण वाढतच जाते.

अ‍ॅसिडिटीच्या रोग्याला पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवते अथवा पोटाच्या वरच्या भागात आग होते. मळमळ वाटते. काहींना उलट्या होतात, ढेकर येतात. भुकेच्या अवस्थेत पोटात अस्वस्थता अधिक वाटते. डोके दुखते, जेवल्यानंतर ही अस्वस्थता कमी होते.

वरील लक्षणांसोबतच रोग्याला कमकुवतपणा नेहमी जाणवतो. थकवा लवकर येतो. सकाळी उठल्यावर उत्साह न जाणवता हातपाय गळाल्यासारखे वाटते, चक्कर येतात. वरील विविध लक्षणांमुळे काही रोग्यांमध्ये त्यांच्या विशिष्ट मानसिक अवस्थेतून निद्रानाशाचा विकार होतो.

पोटामुळे घशाचा त्रास निर्माण झालेले असे रोगी बहुतेक वेळा एका घशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून दुसर्‍या घशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे फिरत असतात. परंतु पोटासाठी पुरेसे उपाय मात्र करवून घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा रोग समाधानकारकपणे कमी होत नाही.

अशाप्रकारे विविध प्रकारची लक्षणे या प्रकारच्या रोग्यांमध्ये पाहावयास मिळतात.

कुटुंबातील भावनिक व आर्थिक अस्थिरता, विवाहित जीवनातील वैफल्य, असुरक्षिततेची भावना, इतर मानसिक ताणाची कारणे यामुळे या रोगाची लक्षणे वाढतात.

श्रद्धेचे बळ औषधांपेक्षा जास्त असते. माणसाच्या मनात बर्‍याचशा व्याधी घर करून असतात. ज्या रोगाबद्दल व्यक्तीच्या मनात भीती, चिंता इ. असते, त्या रोगांना श्रद्धायुक्त उपचाराचा फायदा होतो.

कॅन्सर फोबिया (कॅन्सरच्या भयग्रस्ततेचा रोग)
दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात घशाच्या कॅन्सरने मृत्यू व्हावयाचे प्रमाण वाढत असून पान, तंबाखू, सुपारी, अति तिखट मसाल्याच्या पदार्थांचे सेवन, अति चहा इ. भारतीय समाजातील व्यक्तीच्या या सामाजिक व वैयक्तिक सवयींमुळे भारतात घशाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. शरीरातील सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी 30 ते 40% कॅन्सर घशात अथवा तोंडात होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या अथवा दूरच्या नात्यात अथवा जवळपासच्या वस्तीत घशाच्या कॅन्सरने ग्रस्त झालेली वा घशाच्या कॅन्सरने मरण पावलेली व्यक्ती असतेच. त्यामुळे कर्करोगाची (कॅन्सर) मानसिक दहशत जनसामान्यांमध्ये वाढत आहे.
डॉ. प्रमोद महाजन

LEAVE A REPLY

*