ग.स.बँक सभासदांच्या वारसांना दोन कोटींचे वाटप

0

धुळे / येथील धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लि.धुळे बँकेने सामुहिक विम्याच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये बँकेच्या 52 मयत सभासदांच्या वारसांना 2 कोटी 8 लाख रुपयांचे क्लेम मिळवून दिले आहेत.

बँकेच्या 30 एप्रिल 2017 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यापैकी 9 मयत सभासदांच्या वारसांना बँकेचे चेअरमन दत्तात्रय अनंत शिंदे व बँकेच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या झालेल्या मासिक सभेत धनादेश वाटप करण्यात आले.

धुळे व नंदुरबार जिल्हा ग.स. बँकेचे सभासदांचा सामुहिक विमा उतरविलेला आहे.

बँकेच्या सभासदांचा अचानक मृत्यू झाल्यास बँकेची कर्जवसुली होईलच याची शाश्वती नसते.

त्यामुळे बँकेचे तसेच सभासदांचे परिवाराचे नुकसान होते. बँकेचे सभासदांना ऐच्छीक स्वरुपात सदर विमा योजना ठेवली असून चालू आर्थिक वर्षात आतापावेतो 52 मयत बँकेच्या सभासदांना डी.एच.एफ.एल. प्रिमियम इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीकडून लाभ मिळालेला आहे.

सदर कंपनीकडून बँकेने विमा योजना स्वीकारलेली असून मयत सभासदांचा क्लेमचा पाठपुरावा करून बँकेने आतापर्यंत दोन कोटी आठ लाख रुपयांचे क्लेम मंजूर करून घेतले आहेत.

यामुळे मयत सभासदांकडे असलेल्या थकबाकीतून 87 लाख 28 हजार रु. वसुली झाली आहे. तर एक कोटी 20 लाख 71 हजार रुपयांचे क्लेम सभासदांच्या वारसांना सुपुर्द करण्यात आलेले आहेत.

त्याचबरोबर अजुनही 23 मयत सभासदांचे क्लेम पेडींग असून मंजुरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेले आहेत.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 9 मयत सभासदांच्या वारसांना चेअरमन व बँकेच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते धनादेश देण्यात आलेत.

 

LEAVE A REPLY

*