ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज-रमेश सोनवणे

0

चाळीसगाव, | प्रतिनिधी :  जागृत ग्राहक, तत्पर संघटना, प्रामाणिक दुकानदार व गतीमान प्रशासन यांनी ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी तत्परता दाखवून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन केल्यास समाज समर्पित अशा जागृत ग्राहक निर्मीतीसाठी वेळ लागणार नाही  असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे यांनी केले.

जागतिक ग्राहक दिनानिमीत्त ग्राहक प्रबोधनासाठी तहसिल कार्यालयामार्फत बुधवार दि.१५ रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उमंग संपदा पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी बाबासाहेब चंद्रात्रे, अण्णा धुमाळ, राजेश ठोंबरे, आनंदा साळुंखे, विकास वाणी, विवेक चौधरी, अरुण पाटील, विजया पवार यांच्यासह तहसिलदार कैलास देवरे, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, तालुका कृषी अधिकारी  राजपुत, वैध मापन शास्त्र कार्यालयाचे संजय देशपांडे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे आदि उपस्थित होते.

महिला ग्राहकांचे फसव्या जाहिरातींमुळे फसवणूकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने त्यांना घराबाहेरील व्यवहारासाठी वंचित रहावे लागते. यासाठी महिलांना स्वावलंबनाचे धडे देतांना जागृत महिला ग्राहक निर्मीतीकरिता त्यांना प्रबोधन देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयेाजन करणे गरजेचे असल्याचे उमंग संपदा पाटील यावेळी मानोगत व्यक्त करतांना म्हणाल्या.
तहसीलदार देवरे यांनी आपल्या मानोगतात माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगीतले. तसेच ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी जनजागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणा तत्पर असून यात ग्राहकांचा सहभागही महत्वाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर, १९८६ साली पारित झाला असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते.

म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने महसूल कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदेश निकुंभ यांनी केले तर आभार नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*