ग्रामस्थांनी तयार केलेल्या आराखड्यास केराची टोपली

0
कापडणे / लघुसिंचन विभागास मनमानी कारभार करायचाचं होता मग शिवार फेरीचा फार्स कशासाठी असा संतप्त सवाल ग्रामस्थांतुन विचारला जात आहे.
ग्रामस्थ व विविध शासकिय विभागांच्या शिवार फेरीनंतर तयार केलेल्या आराखड्यास लघुसिंचन विभागाने सरळ केराची टोपली दाखविली आहे.

शिवार फेरीतुन तिसगांव परीसरात सुचविण्यात आलेली कामे परस्पर वडेल शिवारात करण्यात आली. मग शिवार फेरीतुन आराखडा तयार करायचे नाटक कशासाठी? अशा तिखट प्रतिक्रिया ग्रामस्थांतुन उमटत आहेत.

जलयुक्त शिवाराचे काम तिसगांवऐवजी वडेलच्या बंधार्यात केल्याच्या अजब प्रकाराबाबत ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमीकेत आहेत.

दै.देशदूतने हा प्रकार उजेडात आणुन हा विषय ग्रामस्थांच्या हितासाठी लावुन धरल्याने देशदूतच्या भूमीकेचे स्वागत होत आहे.

राज्य शासनाच्या 5 डिसेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार ङ्गसर्वासाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र -2019 या मध्यवर्ती संकल्पेनुसार जलयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यभरात सुरु झाली.

13 शासकीय योजनांचे एकात्मीकरण असलेल्या या योजनेचे चांगले फलितही बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत असतांनाच मात्र काही ठिकाणी गरबड झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

जलयुक्त शिवार अभियान या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत लघुसिंचन विभागाने मनमानी केल्याचे समोर आले आहे.

तिसगांव(ता.धुळे) शिवारातील साठवण बंधार्यात करावयाचे काम चक्क वडेल शिवारातील हिवर्या धरणात करण्यात आले आहे.

नियोजित बंधार्याऐवजी प्रत्यक्षात काम भलत्याच ठिकाणी झाल्याच्या या अजब प्रकाराच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्दे ग्रामस्थांतुन पुढे येत आहेत.

विशेष म्हणजे जेथे काम करण्यात आले त्या वडेल गावाचा जलयुक्त शिवार अभियानातच समावेश नसल्याचे पुढे आले आहे.

जलयुक्तमध्ये गावांची निवड निश्चित झाल्यानंतर या गावात शिवार फेरी काढून कृती आराखडा तयार करावयाचा असतो. गावासाठी फायदेशिर ठरेल असे योग्य काम या अभियानात घेतले जावे यासाठी ग्रामस्थ व सबंधित विविध विभागांचे अधिकारी हे एकत्रितपणे ही शिवार फेरी काढतात.

या शिवार फेरीतुन तयार झालेल्या आराखड्यास ग्रामसभेत मंजूरी घेऊन हा जिल्हाधिकार्यांकडे पाठविला जातो. हा केंद्राभिमुख आरखडा ग्रामसभेत मंजूर होतो.

त्यानंतर तालुका व जिल्हा कृती आराखड्यास विभागीय आयुक्त अध्यक्ष असलेल्या विभागीय समितीची मान्यता घेण्यात येते. ऐवढ्या पातळ्यांवर आराखडा मंजुर झाल्यानंतर त्यात जलसिंचन विभागाने केलेल्या मनमानी बदलामुळे या विभागाचा मुजोरपणा समोर आला आहे.

गावाच्या आराखड्यास ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतरच सबंधित सक्षम प्राधिकार्यांकडुन कोणत्याही कामाची तांत्रिक व प्रशासकिय मान्यता मिळते.

तिसगावच्या आराखड्यात जर तिसगावच्या बंधार्याचा उल्लेख आहे तर तो परस्पर वडेलला वळविण्याचा अधिकार लघुसिंचनचा दिला कोणी? असा सवाल ग्रामस्थातुन विचारला जात आहे.

ग्रामसभेपेक्षा जर सदर विभागाला जास्तीचे अधिकार असतील तर शिवार फेरी, आराखडा आदी नाटक करण्याची आवश्यकताच काय होती, हा केवळ फार्स कशासाठी? असे सवाल ग्रामस्थातुन उभे राहत आहेत.

तिसगावचे हक्काचे काम परस्पर दुसर्या वडेल शिवारात भलत्याच ठिकाणी करणार्या लघुसिंचन विभागाची चौकशी करुन कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

दै.देशदूतने हा विषय ग्रामस्थांच्या हितासाठी लावुन धरल्याने ग्रामस्थांनी देशदूतच्या भूमीकेचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

*