‘ गोरक्षकांना गडकरींची तंबी?

0
कुठल्याही दूरचित्रवाणी वाहिनीवर भगवे कपडे परिधान केलेला कुणी दिसला की लगेच त्याचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडला जातो. भगव्या कपड्यातील प्रत्येक जण भाजपचाच असतो असे नाही. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार गोहत्याबंदीच्या बाजूने ठामपणे उभा आहे. मात्र गोवंशरक्षणाच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी व हिंसाचार आम्हाला मुळीच मान्य नाही.

गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार व तत्सम प्रकारांमुळे सामाजिक तणाव वाढून विकास प्रक्रियेला खीळ बसत आहेे. असले गोरक्षक आमचे नाहीत’ असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. इतक्या परखडपणे भूमिका मांडू शकणारे फारच कमी मंत्री सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असावेत; पण एक प्रश्‍न नक्कीच उभा राहतो.

हा खुलासा करण्यासाठी गडकरी यांनी इतका उशीर का केला असावा? त्यासाठी तीन वर्षे का वाट पाहिली असावी? ‘टायमिंग’ साधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गडकरींनी या बाबतीत कोणते ‘टायमिंग’ साधले असावे? स्वयंघोषित, तथाकथित गोरक्षकांनी संपूर्ण देशात उच्छाद मांडला आहे. तो माध्यमांमधून वरचेवर गाजत आहे. गोरक्षकांच्या मारहाणीत हरियाणात एका शेतकर्‍याचा जीव गेला.

उज्जैनमधील एका तरुणाला पट्ट्याने मारहाण करण्याचा व्हिडीओ गाजला. मेलेल्या जनावराचे कातडे काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणार्‍या चार दलित तरुणांची गुजरातेतील तथाकथित गोरक्षकांनी जी अवस्था केली ती बघून सारा देश हबकून गेला होता.

देशाच्या कृषिप्रधान संस्कृतीत गायीबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना भारतीयांच्या रक्तात आहे. प्रसंगोपात ती व्यक्तही होत असते; पण गोप्रेमाचे सामूहिक उमाळे येणारे आणि त्यासाठी दहशतीचा व हिंसेचा मार्ग पत्करणारे हे स्वयंघोषित गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या तीन वर्षांतच देशात कसे उगवले? कधीकाळी भारतीय शेतीवर टोळधाडीचे आक्रमण होत असे.

सध्या गोरक्षकधाडीने ती जागा घेतली आहे का? तीन वर्षांनी का होईना गडकरींना या टोळधाडीचा निषेध करण्याची सद्बुद्धी झाली; पण अशा समाजविघातक प्रवृत्तींना चाप लावणार कोण? ही सरकारची जबाबदारी नव्हे का? सरकारही गडकरींच्याच पक्षाचे आहे. तथापि गोरक्षकांच्या देशविघातक चाळ्यांना चाप लावण्यात सरकार का कमी पडते?

केवळ तोंडी ताकिदीने गोरक्षकांचा उत्साह आणि उच्छाद थांबणार का? खुद्द पंतप्रधानांनीसुद्धा तो प्रयत्न केला; पण राज्य सरकारे अशा विधायक सल्ल्याकडे कानाडोळा करण्यास धजावतात. म्हणूनच गोरक्षकांचे चाळे अनिर्बंध चालू राहू शकतात हे का गडकरींना सांगायला हवे?

LEAVE A REPLY

*