गोदेचा उद्धार हेही स्वप्नरंजनच?

0
हिमालयातून उगम पावणार्‍या गंगा नदीला भारतीय संस्कृतीत अढळ स्थान आहे. गंगाकाठावर अनेक धर्मस्थळे वसली आहेत. करोडो लोकांची जीवनवाहिनी बनलेली गंगा आज मात्र सर्वस्वी ‘मैली’ झाली आहे. स्वच्छता करून तिचा उद्धार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘नमामि गंगे’ नावाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली गेली. हजारो कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले.

तरीही गंगा अजूनही ‘निर्मळ’ झालेली नाही. गंगेइतकेच धार्मिक महत्त्व असलेली गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात उगम पावते. महाराष्ट्र आणि आंध्रच्या काठावरचा मोठा प्रदेश तिने समृद्ध केला आहे. लक्षावधी लोकांची तहान ती भागवते. हजारो हेक्टर शेतजमिनींना पाणी मिळते व धनधान्याच्या राशी पिकतात. तथापि जवळच्या त्र्यंबकेश्वरला उगम पावून नाशिकमार्गे पुढे जाणार्‍या गोदावरीची रामाच्याच भूमीत म्हणजे पंचवटीत मात्र पुरती दुर्दशा झाली आहे.

रामकुंड आणि गोदाकाठचा परिसर कमालीचा अस्वच्छ आहे. धुणी-भांडी आणि वाहने धुण्याचा कार्यक्रम तेथे नित्यनेमाने चालतो. निर्माल्याबाबत नाशकात बरीच जनजागृती झाल्याचे सांगितले जाते. तरीही गोदापात्रात निर्माल्य टाकण्याची ‘धार्मिकता’ कायमच आहे. पावसाळ्यात पूर आल्यावर गोदापात्र स्वच्छ होते.

त्यामागोमाग मात्र गोदेला गटारगंगेची अवकळा येते. ठराविक काळात धरणांतून सुटणार्‍या पाण्याच्या आवर्तनामुळे गोदा खळाळते. काही स्वयंसेवी संस्थांनी गोदा प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. गेली पाच वर्षे गोदा प्रदूषणाचा प्रश्न गाजत आहे. गोदापात्र स्वच्छता ही नाशिक मनपाची जबाबदारी आहेे. सोबतच पोलिसांवरही ही जबाबदारी सोपवली गेली आहे.

तथापि गोदेच्या नशिबी आलेले अस्वच्छतेचे दशावतार कायम आहेत. रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण होऊ नये म्हणून नाशिक पोलीस नव्या दमाने मैदानात उतरणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या खर्‍या! दोन महिन्यांच्या या मोहिमेत प्रदूषण करणार्‍यांना वठणीवर आणून गोदावरी प्रदूषणमुक्तीचे स्वप्न पुरे करण्याच्या दिशेने पोलीस पाऊल टाकणार आहेत असे सांगितले गेले. तथापि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंदोबस्त आणि नित्याच्या जबाबदार्‍या पेलताना गोदा ‘मैली’ करणार्‍यांवर पोलीस किती प्रभावीपणे कारवाई करू शकतील?

कोणतेही काम टाळायला तरबेज असणार्‍या सरकारी सेवकांकडे सध्या निवडणूक काम ही रामबाण सबब सतत हाताशी आहे. त्यामुळे गोदा प्रदूषण रोखण्याबाबत पोलिसांकडून घेतला जाणारा पुढाकार हा कितपत प्रभावी ठरेल? मनपा आणि पोलीस यंत्रणा यांच्यात सुसूत्रता क्वचितच आढळते. अशा स्थितीत गोदावरीचा उद्धार हे स्वप्नरंजनच ठरणार का?

LEAVE A REPLY

*