गोदा प्रदुषणमुक्तीसाठी होणार दंड, तरीही ना चिंता ना भय…

0

नाशिक : दक्षिण गंगा म्हणुन संबोधले जात असलेल्या गोदावरी नदी प्रदुषण मुक्तीसाठी नाशिक महपाालिकेकडुन येत्या 1 एप्रिलपासुन प्रदुषण करणार्‍यांवर दंडाची कारवाई केली जाणार आहे. या थेट कारवाईसाठी चार दिवस बाकी असतांना अजुनही गोदा प्रदुषण बिनधास्त केले जात आहे. गोदा प्रदुषणाबाबत मोठी जागृती होऊनही प्रदुषण करणार्‍यांना ना भय व ना चिंता असे चित्र गोदाकाठावर बघायला मिळत आहे.

नाशिकमधील गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित केली जात असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणमुक्तीसाठी निरीच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. यात रामकुंड परिसरात गोदापात्रात कपडे व वाहने धुणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. मात्र नंतर हे पोलीस पथक बरखास्त झाले. त्यानंतर प्रदुषणात आजपर्यत भर पडत गेली.

आता महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी कठोर पावले उचलली आहेत. महापालिकेने गोदापात्रात प्रदूषण रोखण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्याचे जाहीर केले आहे. येत्या 1 एप्रिलपासून म्हणजे अजुन 4 दिवसांनी गोदावरी नदीत प्रदूषण करणार्‍यांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नदीत घाण टाकण्याचा पहिला गुन्हा करणार्‍यांना 1 हजार आणि दुसरा गुन्हा करणार्‍यांना 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. अशाप्रकारे कठोर कारवाई आता गोदा प्रदुषण करणार्‍यांवर केले जाणार आहे.

अशाप्रकारे महापालिकेने एकीकडे गोदाप्रदुषण मुक्तीसाठी कठोर पाऊल उचलले असले तरी दुसरीकठे मात्र गोदावरी प्रदुषणाचे काम बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसुन येत आहे. सध्या शाळांना सुट्टी लागल्याने शहरात पर्यटकांची गर्दी वाढु लागली असुन रामकुंडाच्या परिसरात भाविक धार्मिक कार्यक्रमांसाठी गर्दी करीत आहे.तरही रामकुंडाच्या वरील भागात एकमुखी दत्त मंदीराजवळ गोदापत्रात कपडे धुण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी बघालया मिळत आहे.

हेच चित्र य. म. पटांगण, पांड मिठाई पुल, खंडेराव महाराज मंदीर व गाडगे महाराज पुलाच्या भागात दिसत आहे. गाडगे महाराज पुलाखाली तर दुचाकी वाहने धुण्याचे काम सुरू आहे. अशाप्रकारे नागरिकांकडुन गोदा प्रदुषणात भर टाकली जात आहे. गोदापात्रात पाणी वाहते नसल्याने दिवसेदिवस प्रदुषणात भर पडत आहे. या प्रकारामुळे शहरात येणार्‍या पर्यटक व भाविकात नाशिकमधील रामकुंड परिसरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी उमटत आहे.

LEAVE A REPLY

*