गोदावरीचे कालवे झाले वाहते…

0

अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरी उजव्या कालव्यांना काल सोमवारी रात्री 9 वाजता पाणी सोडण्यात आले. नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍याची लेव्हल झाल्यानंतर हे पाणी सोडण्यात आले. गोदावरीचा उजवा कालवा 300 क्युसेकने तर डावा कालवा 150 क्युसेक ने वाहता झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तसेच उन्हाळी सिंचनाच्या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.

 

 

3 मे रोजीच दारणातून सायंकाळी 6 वाजता 1100 क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्यात 500 क्युसेकने वाढ करुन दारणाचा विसर्ग 1600 क्युसेक करण्यात आला आहे. तर 4 मे पासून मुकणे धरणातून 1000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. असा एकूण 2600 क्युसेकने विसर्ग खाली नांदुरमधमेश्‍वरमध्ये दाखल होत आहे. या बंधार्‍याची लेव्हल एक दिवस उशीराने आल्याने रविवार ऐवजी सोमवारचा मुहूर्त पाणी सोडण्यासाठी मिळाला आहे. नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍याची लेव्हल 30.40 फूट झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले. या बंधार्‍यात 107 दलघफू पाणी साठा झाला आहे.

 
गोदावरी उजव्या कालव्यातून हे पाणी 12 मे रोजी सकाळी राहाता तालुक्यात दाखल होईल तर डाव्या कालव्यातील पाणी 10 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोपरगाव परिसरत तर 11 मे रोजी पढेगाव परिसरात दाखल होईल. या दोन्ही कालव्यांवरील एकूण 2700 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्यात येणार आहे. पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याच्या योजनांना पाणी सोडण्यात येईल. त्यानंतर सिंचनाला प्रारंभ होणार आहे. 7 ते 8 दिवसांनी पाणी आल्यानंतर सिंचनाला सुरुवात होईल. असा अंदाज आहे.

 
डोंगळे काढण्याची मोहीम जोरात
दरम्यान या आवर्तनातील पाण्याचा अवैध मार्गाने उपसा होवू नये यासाठी जलसंपदा विभागाने पोलीस बंदोबस्तात डोंगळे काढण्याची मोहीम सुरु केली आहे. सोमवारी निफाड तसेच लासलगाव तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. आज मंगळवारी राहिलेला नाशिक जिल्हा तसेच कोपरगाव तालुक्यातील काही भागातील डोंगळे काढण्यात येणार आहेत. पाण्याच्या पुढेही कारवाई सुरु राहणार आहे.

LEAVE A REPLY

*