गोदाघाटावर विक्रेते, ग्राहकांची रेलचेल होळी, धूलिवंदनासाठी सजली बाजारपेठ

0

नाशिक | दि. १० प्रतिनिधी- एक दिवसावर येऊन ठेवलेल्या होळी व धूलिवंदन सणांसाठी लागणार्‍या साहित्याने शहरातील बाजारपेठ सजली आहे. यासह होळीला लागणार्‍या गोवर्‍या, लाकडे तसेच इतर साहित्य खरेदीसाठी गोदाघाटावर विके्रत्यांसह ग्राहकांची रेलेचेल सुरू झाली आहे. हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा रविवारी (दि. १२) साजरी होत आहे. यासाठी बाजार सज्ज झाला आहे.

यासह यंदा जिल्ह्यात पाऊस जोरदार झाल्याने व मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने होळीसाठी सर्वत्र उत्साहाच वातावरण जाणवत आहे. शहरासह ग्रामीण भागातही सणाचा मोठा उत्साह दिसत असून सर्वत्र खरेदीची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

होळीच्या सणासाठी लागणारे हार,कडे, होलीका पूजेचे साहित्य, उस, एरंड, यासह धूलिवंदनची तयारी मुलांनी आताच सुरू केल्याने विविध रंगही बाजारात दाखल झाले आहेत. यामध्ये रासायनिक व हानिकारक रंगांना दूर ठेवले जात असून नैसर्गिक रंगांना चांगली मागणी आहे.

तसेच लहान मुलांसाठीच्या विविध रंग, आकार व क्षमतेच्या पिचकार्‍यांनी बाजारपेठ सजली आहे. अशा साहित्याची बाजारात रेलचेल दिसत असून खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी गर्दी होऊ लागली आहे. यासह होळी सणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तसेच इतर गोड पदार्थ केले जातात. यासाठी किराणा सामानाच्या दुकानांमध्येही गर्दी दिसत आहे.

होळीसाठी लागणार्‍‌‌या गोवर्‍यांनी गंगाघाट परिसर गजबजला आहे, तर गाडगे महाराज पुलाखाली यंदा जिल्ह्यासह पररराज्यातील विक्रेतेही होळीसाठी लागणर्‍या साहित्याची विक्री करताना दिसत आहेत. त्यामध्ये विशेषत: पेठ, हरसूल येथील आदिवासींनी मोठ्या प्रमाणात गोवर्‍या विक्रीस आणल्या आहेत. काही प्रमाणात गुजरात राज्यातील डांग येथील आदिवासी बांधवदेखील आले आहेत.

आता शनिवार तसेच रविवारी सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दी उसळणार असल्याचे अंदाज बांधून विक्रेते तयारीला लागले आहेत. केवळ गोदाकाठी होणार्‍या गोवर्‍यांची उलाढाल ही काही लाखांची असते. गतवर्षी होळीवर दुष्काळाचे सावट होते; मात्र यंदा पाऊसपाणी यंदा चांगले असल्याने बाजारात खरेदीसाठीदेखील ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

गोवर्‍यांना आला भाव
यंदा सर्वत्र सण मोठा होणार असल्याचे आडाखे बांधून सणासाठी लागणार्‍या गोवर्‍या शहरात दाखल झाल्या आहेत. परंतु मागील तुलनेत गोवर्‍या यंदा भाव खात आहेत. सरासरी ७० रुपयांत मिळणारी गोवरी आता ११० रुपये सांगितली जात आहे, तर मोठी गोवरी १५० रुपयांना विकली जात आहे. तर मोठ्या थापलेल्या गोवर्‍या साधारण २०० रुपये शेकडा या दराने विक्री केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

*