गोदाई महोत्सवास आज प्रारंभ ; पंकजा मुंडे करणार उद्घाटन ; वस्तूंसह खाद्यपदार्थांची रेलचेल

0

नाशिक : महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीने नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री गोदाई 2017 महोत्सवाचे आयोजन उद्या शनिवारी करण्यात आले असून त्याचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

डोंगरे वसतिगृहावर सकाळी 11 वाजता या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा होणार असून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

5 ते 9 मार्च या कालावधीत होणार्‍या या मेळाव्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात 5 तारखेला गर्जा तो मराठी, 6 मार्चला सदानंद चांदेकर यांचे हसरी उठाठेव, 7 मार्चला रसिका तुझ्यासाठी हा भावगीतांचा कार्यक्रम, 8 मार्चला बंडा जोशी याचा हास्यपंचमी आणि 9 मार्चला शाहीर विजय तनपुरे हा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी होतील.

या प्रदर्शनासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 25 विविध वस्तूंचे तर 5 खाद्यपदार्थांचे असे 30 स्टॉल असणार आहेत. नाशिकमधून सर्वात जास्त 75 स्टॉल्सची नोंदणी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. दरम्यान, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतूनही स्टॉल्स या ठिकाणी सहभागी होणार आहेत. खाद्यपदार्थांसह ग्रामीण भागातील विविध वस्तूही या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

5 मार्चपासून सकाळी 11 ते रात्री 9 या कालावधीत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू नाशिककरांना खरेदी करता येणार आहेत. याशिवाय गावरान भागातील खाद्यपदार्थांची चवही चाखता येणार आहे.
नाशिककरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*