गोगलगावात वादळाने पॉलीहाऊसचे नुकसान

0

दोन लाखांचे नुकसान; अनुदान आणि शासकीय मदतीची मागणी

 

लोणी (वार्ताहर) – गोगलगाव ता. राहाता येथील रामचंद्र पावसे या शेतकर्‍याने 15 लक्ष रुपये खर्च करून पॉली हाऊस उभारून कार्निशन फुले लावली. त्यासाठी बँकेचे कर्ज घेतले, पण उत्पन्न सुरु होण्याआधीच वादळी वार्‍याने पॉली हाऊसचा दोन लाखांचा कागद फाटून गेला. त्यामुळे कार्निशन फुलांचे पीकही उद्ध्वस्त झाले. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे एक वर्ष उलटूनही शासनाचे अनुदान मिळेना. बँकेचे कर्ज असल्याने हप्त्यांसाठी पैसे कुठून आणायचे याची चिंता? तरी संयम ठेवत त्यांनी कृषी अधिकार्‍यांना बोलावून सर्व परिस्थिती दाखवली आणि शासनाचे अनुदान झालेल्या नुकसानीपोटी तात्काळ मदतीची मागणी केली.

 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2015 ते 16 अंतर्गत शेडनेट हाऊस आणि हरितगृहामधील उच्च दर्जाचे लागवड साहित्य या अंतर्गत रामचंद्र तात्याबा पावसे यांनी गोगलमध्ये 20 गुंठे जमिनीत पॉली हाऊस उभारून त्यात कार्निशन फुलांची लागवड केली. जिरायती भाग असल्याने शेततळे आणि टँकरने पाणी आणून ही फूलशेती आदर्शपणे फुलवली. पण निसर्गाचा प्रकोप त्यांच्या कष्टावर पाणी फिरून गेला. अचानक आलेल्या वादळी वार्‍याने पॉली हाऊसच्या कागदाचे तुकडे करून टाकले. त्यातील फुलांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ते गावातील कृषी सहायकांपर्यंतच्या सर्व कार्यालयांचे त्यांनी उंबरे झिजवले.

 

अखेर कृषी अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, कामगार तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि सर्वांकडून एकच उत्तर मिळाले आमच्या हातात होते तेवढे आम्ही केले, आता शासन निर्णय घेईल तेंव्हा तुम्हाला कळवू. शासनाकडे अनुदानासाठी निधी नाही आणि भरपाईसाठी पैसे नाहीत. फक्त प्रस्ताव तयार करणे एवढेच काम अधिकारी करीत आहेत. खरे तर शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना त्याला शासनाचे अडमुठे धोरण आडवे येत आहे. पावसेना फक्त तातडीची गरज त्यांच्या शासकीय नियमांनुसारच्या अनुदानाची आहे. ती वेळेवर झाली तर ते नवीन कागद आणून त्यांची फुलशेती पुन्हा उभी करू शकतात. त्यांचे नुकसानही कमी होण्यास मदत होईल पण अधिकार्‍यानीच आता पालकमंत्री आणि कृषिमंत्र्यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य सांगण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*