गोंदेश्वर मंदिर गाभार्‍यातील कळस उचकवण्याचा प्रयत्न

खजिना शोधण्याच्या बहाण्याने प्रयत्न झाल्याची चर्चा; पिंडीचे नुकसान

0

सिन्नर : सिन्नरच्या ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या मुख्य गाभार्‍यातील शंकराच्या पिंडीच्या वरच्या बाजूला असणार्‍या कळसाच्या आतील तळी पहारीच्या सहाय्याने उचकवण्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला असून खजिन्याच्या हव्यासातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

या घटनेत मंदिराच्या मुख्य पिंडीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही हे मंदिर ताब्यात असलेल्या पुरातत्त्व विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मंदिराच्या सभागृहासह परिसरातील साफसफाईसाठी लाकडी शिडी बनवण्यात आली असून याच शिडीचा वापर करून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभार्‍यात अवजड अशी तळी उचकवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

मंदिर गाभार्‍याच्या वरच्या बाजूला गोलाकार पण निमुळत्या होत गेलेल्या कळसाला दगडाच्या तळीने बंद करण्यात आले आहे. ही तळी सहजासहजी एका माणसाला उचलणे अवघड असून दोघा-तिघांनी लोखंडी पहारीच्या सहाय्याने ती तळी जवळपास अर्धा-पाऊण फुटापर्यंत हलवण्यात यश मिळवले आहे. त्यातून या तळीच्या दगडाच्या किलच्या खाली मुख्य पिंडीवर पडल्याने पिंडीला दिलेले अस्तर (कोटिंग) तुटले आहे. या पुरातन पिंडीला भाविकांकडून दूध, दही, पाण्याने न्हाऊ घालण्यात येते.

त्यातून जीर्ण झालेल्या दगडी पिंडीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्त्व विभागानेच काही वर्षांपूर्वी पिंड व खालच्या शाळुंकाला कोटिंग केले होते. त्यातील अर्धे अधिक कोटिंग, त्याचा पापुद्रा निघाल्याने पिंड अर्धी अधिक उघडी झाली आहे.
मुख्य पिंडीला चिर पडल्याचेही त्यातून स्पष्ट दिसू लागले असून ही बाब दर सोमवारी दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या लक्षात आल्यावर या अजब चोरीवर प्रकाश पडला आहे. मंदिराच्या गाभार्‍यातील दगडाच्या व कोटिंगच्या किलच्या घाईघाईने गोदावरीत नेऊन टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे गाभार्‍यात दोन वाकलेल्या पहारीदेखील आढळल्या असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत असून दगडी किलच्या आणि या पहारी गायब करून झाला प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. हे ऐतिहासिक मंदिर पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून त्यावर एका पहारेकर्‍याची नेमणूक करण्यात आली आहे.

दिवसभर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मंदिराच्या परिसरात गर्दी असते. मात्र संध्याकाळनंतर मंदिराकडे फारसे कुणी फिरकत नाही. याचा फायदा घेऊन या ऐतिहासिक ठेव्याला धक्का पोहोचवण्याची हिंमत अज्ञात व्यक्तींनी केली आहे. या मंदिरासह परिसराची रखवाली करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने एका रखवालदारापलीकडे कुठलीही व्यवस्था केलेली नाही. पुरातत्त्व विभागालाच या ऐतिहासिक ठेव्याची किंमत समजणार नसेल तर दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न सर्वसामान्य सिन्नरकरांना पडला आहे.

LEAVE A REPLY

*