गेम चेंजर ठरण्याऐवजी जलयुक्तचाच ‘गेम’ होण्याची भिती

0
रामकृष्ण पाटील,धुळे । दि.12 ।-विविध शासकीय 13 योजनांच्या एकात्मीकरणातुन जलयुक्त शिवार अभियान जन्मास आले. टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या मध्यवर्ती संकल्पनेची ही योजना ‘गेम चेंजर’ ठरू शकते असे मुख्यमंत्री म्हणतात.
परंतु या अभियानाचाच ‘गेम’ होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत काम करतांना लघुसिंचन विभागाने तिसगांवऐवजी वडेलच्या बंधार्‍यात काम केल्यानंतर या विभागाच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लघुसिंचनच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत असुन ग्रामस्थांना न्यायाची प्रतिक्षा आहे.
जलयुक्त शिवारात सर्वात जास्त महत्व दिले जाते ते म्हणजे शिवार फेरीला. मात्र ग्रामस्थ व विविध शासकिय विभागांच्या शिवार फेरीचा तिसगावांत केवळ फार्स करण्यात आला.

यानंतर तयार केलेल्या आराखड्यास लघुसिंचन विभागाने सरळ केराची टोपली दाखवत शिवार फेरीतुन तिसगांव परीसरात सुचविण्यात आलेली कामे परस्पर वडेल शिवारात केली.

या अजब प्रकाराबाबत ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दै.देशदूतने हा प्रकार उजेडात आणुन आणल्यानंतर देशदूतच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

लघुसिंचन विभागाच्या या कारनाम्यांना पाठिशी न घालता वरिष्ठांनीही यात लक्ष घालण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

राज्य शासनाच्या 5 डिसेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार ‘सर्वासाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र -2019’ या मध्यवर्ती संकल्पेनुसार जलयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यभरात सुरु झाली.

यात 13 शासकीय योजनांचे एकात्मीकरण करण्यात आले. या जलयुक्त शिवार योजनेबाबत बोलतांना मुख्यमंत्री यांनी ही योजना ‘गेम चेंजर’ ठरू शकते असे म्हटले होते.

परंतु तिसगावसारखी प्रकरणे पुढे येत असतांना या अभियानाचाच ‘गेम’ होतो कि काय अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

तिसगावचे हक्काचे काम परस्पर दुसर्‍या वडेल शिवारात भलत्याच ठिकाणी करणार्‍या लघुसिंचन विभागाच्या भूमिकेविषयी शंका निर्माण केल जात आहे.

या विभागाची चौकशी करुन कठोर कारवाई होण्याची मागणीही ग्रामस्थांतुन होत आहे. ग्रामस्थांनी या मागणीचा गेली कित्येक दिवस पाठपुरावा करुनही ग्रामस्थांची न्यायाची प्रतिक्षा कायम आहे.

LEAVE A REPLY

*