गावठी कट्ट्याची डील करताना एकाला अटक

0

बुर्‍हाणनगर फाट्यावरील घटना : काडतुसेही जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – बुर्‍हाणनगर फाट्यावर गावठी कट्ट्याची डील सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. माधव उर्फ भाऊ विठ्ठल धाडगे (रा.राहुरी) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत. यातील मुख्य सूत्रधार भैया शेख (रा. कुकाणा, ता. नेवासा) हा पसार झाला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.20) मध्यरात्री एकच्या सुमारास बुर्‍हाणनगर फाटा येथे राहुरी व नेवासा येथील काही तरुण कट्ट्याचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. पवार यांनी त्यांच्या पथकाला घटनास्थळी सापळा रचण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांंनी बुर्‍हाणनगर परिसरात सापळा रचला. पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास दोघे कट्ट्याचा व्यवहार करीत असतांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील नेवाशाचा आरोपी भैया शेख हा पोलिसांच्या तावडीतून सुटला. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या धाडगे याची तपासणी केली असता त्याच्याकडे गवठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. कट्टा व काडतुसे कशासाठी घेतली आहे. अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
धाडगे यास शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोेलीस कोठडीत त्याच्याकडून अधिक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी कारखिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवडे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*