गाडीची काच फोडून साडेतीन लाखाची रोकड लांबविली

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या अग्निशामन विभागाच्या कार्यालयाजवळून भुसावळ येथील भाजपाचे नगरसेवकाच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरटयांनी साडेतीन लाखाची रोकड लंपास केल्याची घटना सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळचे नगरसेवक अमोल मनोहर इंगळे हे सायंकाळी त्यांच्या खाजगी कामानिमित्त त्यांच्या कार (क्रमांक एमएच १९  बीडी ४१४१) ने जळगावी आले होते.त्यांनी त्यांची कार गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या अग्निशामन विभागाच्या कार्यालयाजवळ लावली होती. व ते कामानिमित्त बाहेर गेले होते.

यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून बँगेतील साडेतीन लाख रुपयांची रोकड लांबविली. दरम्यान इंगळे त्यांच्या वाहनाजवळ आले असता, त्यांना त्याच्या कारची काच फोडलेली दिसून आली.

त्यांनी कारमध्ये डोकावून पाहिले असता, कारमधील रोकड लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ  या घटनेची माहिती शहर पोलिसांनी दिली. घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व डीबी पथकातील कर्मचारी दाखल झाले.

दरम्यान याप्रकरणी शहर पोलिसात अमोल इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी शहर पोलिसांनी गोलाणी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु होते.

गोलाणीसारख्या गजबजलेल्या परिसरातून सायंकाळच्या सुमारास कार फोडून रोकड लंपास करण्याच्या या प्रकारामुळे या परिसरात नागरीकांना असुरक्षितता वाटू लागली आहे. याबाबत पोलिसांनी दखल घेवून गस्ती वाढवावी, अशी मागणी होवु लागली आहे.

पॅसेंजरमधून ६५ हजाराचे दागिने लंपास

मुळचे कल्याण येथील रहिवाशी असलेले दिपक पाटील पाचोरा येथून जळगाव येथे पॅसेजरने लग्नानिमित्त येत असतांना त्यांच्या पत्नीच्या बॅगेतून अज्ञात चोरटयांनी ६५ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी दिपक पाटील यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील गिरड येथून नातेवाईकांच्या लग्नासाठी दिपक पाटील जळगाव येथे पत्नी ज्योती पाटील, मुलगा व मुलगीसह पॅसेजरने येत असतांना त्यांच्या पत्नीच्या बॅगेतून अज्ञात चोरटयांनी सव्वादोन तोळेच्या ६५ हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवून नेल्याची घटना जळगाव बसस्थानकावर घडली.

दरम्यान दिपक पाटील यांनी प्रकरणी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

LEAVE A REPLY

*