गळाभेटीचे कवित्व

0

पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का, हा मुद्दा गेले काही दिवस चर्चेत होता. अखेर सिद्धू यांनी पाकिस्तानचा दौरा केला आणि इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहिले. या शपथविधी समारंभानंतर सिद्धू यांनी पाकिस्तानी संरक्षण दलाचे प्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. त्याचे छायाचित्र आणि वृत्त प्रसिद्ध होताच भारतात अनेकांनी टीकेची झोड उठवली. भारतीय सैनिक सीमेचे रक्षण करत असताना पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे भारतीय जवान शहीद होत असताना सिद्धू यांनी अशी गळाभेट घेणे चुकीचे आहे, अशी टीका भाजप आणि या पक्षाच्या संघटनांकडून सुरू झाली.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीदेखील सिद्धू यांची ही कृती योग्य नाही, अशी टीका केली. त्याला उत्तर देताना सिद्धू यांनी हा व्यक्तिगत मित्रत्वाचा दौरा होता, असे म्हटले. पाकिस्तानमधील शिखधर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या करतारपूर साहिबला भेट देण्यासाठी खास रस्ता आणि सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पंजाबमधील शीख जनतेकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात ‘आम्ही या मागणीचा विचार करत असून त्या दृष्टीने पावले टाकत आहोत,’ असे बाजवा यांनी सांगितल्यामुळे आपण त्यांची गळाभेट घेतली, असा खुलासा सिद्धू यांनी केला. या निमित्ताने पाकिस्तान आणि भारतादरम्यानचे संबंध तसेच ते सुधारण्यासाठी काय केले पाहिजे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी बोलणी करून वाटाघाटीद्वारे काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इम्रान खान यांचे अभिनंदन करताना हीच अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. नुकतेच दिवंगत झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी बसमधून लाहोरचा दौरा केला होता आणि दिल्ली-लाहोर बससेवेचा शुभारंभ केला होता. त्याचबरोबर कारगिलमध्ये भारताच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या आणि शेकडो भारतीय सैनिकांना शहीद करणार्‍या परवेझ मुशर्रफ यांना आग्य्राला बोलावून वाटाघाटी केल्या होत्या, याचे विस्मरण अनेकांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर नवाज शरीफ यांच्या मुलीच्या लग्नात अचानकपणे लाहोरला भेट देऊन शरीफ यांची गळाभेट घेतली होती, याचेही सोयिस्कर विस्मरण अनेकांना होत आहे.

शत्रूघ्न सिन्हा यांनीही अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त केली. सिन्हा म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांनी तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळच्या पाक भेटीत तत्कालीन प्रमुखांची गळाभेट घेतली आहे. त्यामुळे सिद्धूने पाकिस्तानच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांची गळाभेट घेणे हा वादाचा विषय होऊ शकत नाही. खरा प्रश्न पाकिस्तानबरोबरचे तणावपूर्ण संबंध कसे सुधारतील, हा आहे. त्यात सर्वात मोठा अडथळा हा काश्मीरचा प्रश्न आणि या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीय राजकारण करून भारत-पाकिस्तान यांच्यात वितुष्ट कायम रहावे म्हणून काम करणार्‍या चीन, रशियासारख्या शक्ती तसेच भारतातील राजकारणासाठी हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्यासाठी काम करणार्‍या संघटना हा आहे.’ या पार्श्वभूमीवर जॉन एफ. केनेडी यांनी क्युबाच्या अण्वस्त्रसज्ज होण्याच्या सुमारास रशियाबरोबर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे आणि आताही मार्गदर्शक ठरणारे आहे. केनेडी म्हणाले होते, ‘वाटाघाटी करण्यासाठी घाबरू नका आणि घाबरून वाटाघाटी करू नका’.

हीच भूमिका पाकिस्तानच्या संदर्भात योग्य ठरेल, असे वाटते. सिद्धू, गावसकर, कपीलदेव आणि अनेक भारतीय क्रिकेटपटूंचे इम्रान खानशी व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचा उपयोग करून भारत-पाक वाटाघाटीचे दरवाजे खुले ठेवून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, हे करताना संरक्षण यंत्रणेत पाकिस्तानी सैन्याचा आणि त्यांच्या व्यूहरचनेचा मुकाबला करण्यात आपण कमी पडणार नाही, याचीही दक्षता घेतली पाहिजे. परंतु, पाकिस्तान आणि भारतातील राज्यकर्ते अनेक वषार्ंंपासून देशांतर्गत राजकारणात विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी पाकिस्तान-भारत तणावपूर्ण संबंधांचा उपयोग करतात, हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यामुळे या दोन देशांमधील तणावाला वेगळे संदर्भ प्राप्त होतात, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानचा उपयोग आधी अमेरिका आणि आता चीन भारताला अडचणीत आणण्यासाठी करतात. हे लक्षात घेऊन भारतीय राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नवीन पंतप्रधानांशी नवीन पद्धतीने व्यवहार करून पुढे जाण्याची गरज आहे.

अर्थात, या सर्वात पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण आणि सैन्याचे हितसंबंध हे अडचणीचे मुद्दे आहेतच. तरीही त्या देशाशी बोलणी सुरू करून ती कायम ठेवणे, व्यापारी संबंध आणि नागरिकांच्या पातळीवरचे संबंध सुरळीत करण्यावर भर देणे, हे अंतिमत: दोन्ही देशातील जनतेच्या हिताचे आहे. त्या दृष्टीने सिद्धू यांच्या गळाभेटीकडे पाहिले जायला हवे. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी सिद्धू हे भाजपचे लाडके नेते होते आणि त्यांनी याच पक्षाकडून राजकारणाचे धडे घेतले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आणखी एक बाब म्हणजे पंजाबमधील मादक पदार्थांच्या वाढत्या मागणीचा आणि त्याच्या पाकिस्तानमधून होणार्‍या तस्करीचा प्रश्नदेखील पाकिस्तान-भारत तणावाशी संबंधित आहे. असे असताना परवाच लंडनमध्ये स्वतंत्र शिखिस्तानच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या निदर्शनामागे पाकिस्तानमधील आयएसआय आणि इतर शक्तींचा हात होता, हे स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे मंत्री म्हणून हा धोका कमी करण्यासाठी इम्रान खानशी आपल्या मैत्रीचा वापर केला तर त्यात काही गैर आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, कशाचेही भांडवल करण्याचा उद्योग करणार्‍यांनी सिद्धू यांच्या गळाभेटीचे भांडवल करणे, प्रसंगी दोन्ही देशातील संबंध सुधारण्यातील अडसर ठरू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.
– भालचंद्र कानगो

LEAVE A REPLY

*