Type to search

ब्लॉग

‘गरिबी हटाव’ राजकारण की वास्तव?

Share
मुंबईच्या इतर मतदारसंघांसह वायव्य आणि कल्याण मतदारसंघात येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. वायव्य किंवा उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी हे पक्ष आपापले बालेकिल्ले राखणार का?

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरूपम निवडणूक लढवत आहेत. वास्तविक उत्तर मुंबईतून निरूपम यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तेथे भाजपचे गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यापुढे आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्यामुळे निरूपम यांनी वायव्य मुंबईतून हट्टाने उमेदवारी मिळवली. संजय निरूपम हे पूर्वी शिवसेनेत होते. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्या अतिशय उर्मटपणे वागण्याच्या पद्धतीमुळे अनेकदा ते टीकेचा विषय बनले आहेत. अलीकडेच त्यांच्याकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. आता वायव्य मुंबईतून निवडणूक लढवताना त्यांना कोण कशी साथ देणार आहे, हा प्रश्न आहे.

हा मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा होता. संजय निरूपम यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना कामत आणि त्यांच्या समर्थकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. कामत यांचे कार्यकर्ते ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे निरूपम यांच्या प्रचारापासून लांब राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर करण्यास झालेला विलंब, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी यामुळे निरूपम यांच्यासाठी ही निवडणूक चांगलीच अवघड ठरणार आहे. भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. या भागात कीर्तीकर यांच्याबद्दल आदर आहे. शिवाय स्थानीय लोकाधिकार समिती, कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. या मतदारसंघात अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव, दिंडोशी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येकी तीन आमदार आहेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ असा वायव्य मुंबई मतदारसंघ होता. आता या मतदारसंघाचे उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य असे दोन मतदारसंघ झाले. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 3 आमदार, 38 नगरसेवक आणि 4 मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी उतरली आहे. भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते कीर्तीकर यांचा प्रचार करत आहेत. गेल्या निवडणुकीत कीर्तीकर पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले होते. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ संमिश्र आहे. इथे जशी उच्चभ्रू वस्ती आहे, तशीच म्हाडा वसाहती, कोळीवाडे, झोपडपट्टीही आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या 6 लाख आहे. त्याखालोखाल उत्तर भारतीय 3 लाख 65 हजार आणि मुस्लीम 3 लाख 45 हजार आहेत. मराठी मतदारांच्या खालोखाल इथे उत्तर भारतीय आणि मुस्लिमांचे प्राबल्य आहे. गुजराती आणि मारवाडी समाजाचेही 2 लाख मतदार येथे आहेत. मात्र या मतदारसंघात 45 ते 50 टक्क्यांवर कधी मतदान फारसे झालेले नाही. त्यामुळे इथली लढत ही नेहमी चुरशीचीच असते.

2009 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून आले होते. पण त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली. संजय निरूपम, कृपाशंकर सिंग आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी याही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पण पक्षश्रेष्ठींनी संजय निरूपम यांच्या बाजूने कौल दिला. निरूपम यांचा या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. त्या जोरावर युतीची मते आपण खेचून आणू, असा दावा निरूपम करतात. गेल्यावेळी मनसेनेच्या उमेदवारालाही 66 हजार मते मिळाली होती. यावेळी मनसेना निवडणुकीत नाही. आता ही मते कुणाच्या पारड्यात जातात, हे पाहावे लागेल.

1984, 1989 आणि 1991, 1999, 2004 मध्ये सुनील दत्त आणि त्यांच्या निधनानंतर प्रिया दत्त खासदार म्हणून येथून निवडून आले. काँग्रेसची कायम झोपडपट्टीवासियांच्या मतांवरच भिस्त राहिली आहे. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मराठी मतदारांची संख्याही मोठी असल्याने शिवसेनेला हा मतदारसंघ आपला वाटतो. कीर्तीकर यांनी खासदार म्हणून केलेल्या कामांची यादीच सादर केली आहे. त्यात पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडीसाठी सहावी लाईन या महत्त्वाच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय वेसावे समुद्रातील गाळ काढण्यासाठी निधी, देशातील स्मार्ट रेल्वेस्थानकांमध्ये अंधेरी-गोरेगावचा समावेश, रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवल्याचा दावा कीर्तीकर करतात. काँग्रेस आपला हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी काय व्यूहरचना करते यावर इथली निवडणूक अटीतटीची होणार की एकतर्फी हे ठरेल.

प्रतिष्ठा पणाला
कल्याण लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. भाजपनेही तेथे आपली ताकद कमालीची वाढवली आहे. कल्याणचे पालकमंत्री एकनाथ शिंदे युतीसंदर्भात पहिल्यापासून अनुकूल भूमिका मांडत होते. याला कल्याण मतदारसंघातील स्थिती हे महत्त्वाचे कारण होते. कारण युती झाली नसती तर इथे श्रीकांत शिंदे यांची खासदारकी कायम राहणे शक्य नाही, याची जाणीव त्यांना होती. राष्ट्रवादीनेे बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यामागेही जातीचे राजकारण आहे. या मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करत होते. पण राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचेच निष्ठावंत मानले जाणारे बाबाजी पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे आणि जातीय समीकरण साधले आहे. या मतदारसंघातील शिळफाटा ते 27 गाव आणि अंबरनाथ, कल्याण, बदलापुरातील काही ग्रामीण भाग येथे आगरी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांची सहानुभूती शिवसेनेला आहे. इथे शिवसेनेला हरवणे सोपे काम नाही. वसंत डावखरे यांच्यासारख्या सामर्थ्यवान नेत्यालाही इथे शिवसेनेच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता. बाबाजी पाटील शिळफाटा परिसरातील देसई या गावाचे रहिवासी आहेत. ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते आणि ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांचे काही वैयक्तिक संबंध आहेत. पण शहरी भागाशी त्यांचा फारसा संबंधही नाही. त्यामुळे शिवसेनेपुढे ते कसे काय आव्हान उभे करू शकणार, हा प्रश्नच आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. पण स्थानिक समस्या सोडवण्यात या युतीला अपयश आले आहे. शहराचे नियोजन फसले आहे. कल्याण ते सीएसटी हा रेल्वे प्रवास अजूनही अनेक अडचणींना तोंड देत पूर्ण करावा लागतो. खासदार शिंदे यांनी त्यांच्या पातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील कलगीतुर्‍यामुळे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. असे असले तरी शिंदे यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली आहे. शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा आणि सुरक्षित मतदारसंघ आहे. तरीही यावेळी मनसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याने निवडणुकीचे गणित बदलू शकते. गेल्यावेळी मनसेनेला 1 लाख 22 हजार मते मिळाली होती. यावेळी मनसेना निवडणूक रिंगणात नाही. पण मनसेनेची मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडतील का, हा प्रश्न आहे. काही राजकीय तज्ञांच्या मते मनसेनेची मते शिवसेनेकडेच जातील. कारण राज ठाकरे यांना लोक शिवसेनेच्या जवळ पाहू इच्छित होते. त्यांनी राष्ट्रवादीचा संग धरल्याने राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्‍या त्यांच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे मनसेनेची मते राष्ट्रवादीला न मिळता शिवसेनेलाच मिळतील, असा अंदाज आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा-मुंब्रा असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील डोंबिवलीत भाजप, कल्याण पूर्वमध्ये भाजपपुरस्कृत अपक्ष, अंबरनाथमध्ये शिवसेना आणि कल्याण ग्रामीणमध्येही शिवसेना असे युतीचे चार आमदार आहेत. तर उल्हासनगर आणि कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आल्या असल्या तरी त्यांचा कल भाजपकडे आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू होत असलेली मेट्रो, रेल्वेचे विस्तारीकरण, महामार्गांचे जाळे अशी कामे युतीसाठी महत्त्वाची आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. पण त्यांनी लोकसभा मतदारसंघात फारसे लक्ष घातलेले नाही. या मतदारसंघातील विविध महापालिकांवर युतीची सत्ता आहे. युतीचे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी केलेली विकासकामे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. सध्या तरी येथील वातावरण युतीसाठी अनुकूल आहे, असेच दिसते.
– मकरंद देशपांडे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!