गप्पा आणि थापा कुठवर?

0
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत पाच वर्षांहून लहान वयाची दीड हजारांपेक्षा जास्त मुले दगावली आहेत. सातपुड्यातील धडगाव आणि अक्कलकुवा या आदिवासीबहुल तालुक्यांत बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध प्रकारच्या तेरा आजारांमुळे जी पंधराशे मुले मृत्यू पावली त्यापैकी निम्म्यांचे आजार बरे होण्यासारखे होते. पालकांनी मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुचवले आहे.

राज्यातील अठ्ठ्यात्तर हजारांपेक्षा जास्त बालके कुपोषित आहेत. वरील सर्व आकडेवारी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालातील आहे. कुपोषणाबाबत नंदुरबार जिल्हा संवेदनशील मानला जातो. आकडेवारीवरून या जिल्ह्यातील कुपोषण समस्येचे गांभीर्य स्पष्ट होते. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाखेरीज दोन उपजिल्हा रुग्णालये, अकरा ग्रामीण रुग्णालये, एकोणसाठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोनशे नव्वद उपकेंद्रे आहेत.

शिवाय फिरती आरोग्य पथके आहेत. तरीही बालमृत्यूंचे चित्र इतके भयावह कसे? जिल्ह्यात जनजागृतीची गरज असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सांगतात. ही तर शासनाची जबाबदारी आहे. जनता जागरुक असावी ही शासनाची अपेक्षा असू शकते; पण त्या दृष्टीने किती प्रयत्न होतात? कुपोषणमुक्तीसाठी करोडोंचा निधी दिला जातो. महिला-बालकल्याण विभागाकडूनच वर्षभरात सहा हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला असे सांगितले जाते.

बाल केंद्रे व्यवस्थापन, पोषण आहार व औषधी पावडरवाटप अशा अनेक योजना राबवल्या जात असल्याचे सांगितले जाते. तरीही पाऊण लाखापेक्षा अधिक बालके कुपोषित का? करोडोंच्या निधीतून पोषण नेमके कुणाचे झाले व होत आहे? याबाबत शासकीय आकडेवारी आणि सामाजिक संस्थांच्या आकडेवारीतही लक्षणीय तफावत का आढळते? कुपोषणमुक्तीसाठी डॉ. अभय बंग यांनी काही उपाय सुचवले होते.

ते शासनाने स्वीकारले का? महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अनाथ बनली आहे, असे मत डॉ. बंग यांनी व्यक्त केले आहे. लोकांना थापा ऐकायची सवय झाली असे शासनाने गृहीत धरून किती गप्पा माराव्यात? कोट्यवधींचा निधी खर्च करूनही आरोग्यव्यवस्था सुधारत नसेल व कुपोषित बालकांची संख्या वाढतच असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याची जबाबदारी शासन पार पाडणार का? वास्तवाचा शोध घेणे सामान्यांच्या आवाक्यात नसते.

तरीही जनता हळूहळू जागी होत आहे. लोक प्रश्न विचारू लागले आहेत. माहितीच्या अधिकाराचा वापर वाढत आहे. जुमलेबाजीमुळे एक-दोन निवडणुका जिंकता येतील, पण जनता कायमच भूलथापांना बळी पडेल हा भ्रम शासन कुठवर पोषित राहणार? वाट बघून थकल्यावर जनता कुणालाही सत्तेवरून पायउतार करते याची जाणीव सत्ताधार्‍यांना एव्हाना व्हायला नको का?

LEAVE A REPLY

*