‘गगनयान’ का पाठवायचे?

0
भारत 2022 मध्ये आपल्या तीन प्रवाशांना इस्रोनिर्मित ‘गगनयान’ यानातून अंतराळात पाठवणार आहे. त्यासाठी सरकारने 10 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या खर्चाबाबत टीका होत असली तरी तो जगाच्या दृष्टीने विचार करता खूप कमी आहे. काय आहेत या मोहिमेचे फायदे?

अंतराळातील मानवी मोहिमांचा इतिहास पाहता आतापर्यंत अंतरिक्षात माणसाला पाठवण्याचा यशस्वी प्रयत्न केवळ अमेरिका, चीन आणि रशिया या देशांनीच केला आहे. रशिया याबाबतील अव्वल होता. त्याने आपला अंतराळवीर ‘युरी एलेकसेविच गागरिन’ला अंतराळात जाणारा पहिला माणूस बनवले. अमेरिकेच्या अंतराळयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. या दोन्ही यशोगाथांना आता पाच दशकांहून अधिकचा काळ लोटला आहे. यादरम्यान चीनने दीड दशकापूर्वी 15 ऑक्टोबर 2003 मध्ये एक चिनी नागरिक यांग लिवेई याला शिंझोऊ 5 या यानातून अंतराळात पाठवले होते. यशाच्या या यादीमध्ये भारताचे नावही सामील आहे. भारताने स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा याला 2 एप्रिल 1984 मध्ये पहिला भारतीय अंतराळवीर म्हणून अंतराळात पाठवले. अर्थात यामध्ये रशिया या मित्र देशाचा वाटा होता. कारण रशियाच्या सोयूज 11 या यानातून राकेश शर्मा अंतराळात पाऊल ठेवू शकले. आता मात्र भारताला स्वबळावर असाच इतिहास रचायचा आहे.

भारत 2022 मध्ये आपल्या तीन प्रवाशांना इस्रोनिर्मित ‘गगनयान’ यानातून अंतराळात पाठवणार आहे. त्यासाठी सरकारने 10 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या अभियानाचा उद्देश देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला एका नव्या पातळीवर घेऊन जाणे हा आहे. तसे अंतराळ शोधमोहिमेसाठी नवे मार्ग खुले होतील. मात्र हजारो कोटी रुपये खर्च होण्याव्यतिरिक्तही अनेक गोष्टींमुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गरीब आणि विकसनशील देश या नात्याने या अभियानावरही प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे जे पहिल्या चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेविषयी निर्माण झाले होते. देशातील शेतकरी आत्महत्या करतो आहे, लाखो करोडो तरुण बेकार आहेत तेव्हा अशा परिस्थितीत तीन लोकांना अंतराळात पाठवण्यासाठी आखल्या जाणार्‍या योजनेवर दहा हजार कोटी रुपये खर्च करणे नक्कीच अवाजवी वाटू शकते. मग प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की, तीन लोकांना अंतराळ प्रवासाला पाठवणे इतके महत्त्वाचे आणि गरजेचे आहे का की लाखो लोकांच्या शिक्षणावर, वैद्यकीय उपचारांसाठी, घरासाठी, वीज, पाणी, रस्ते या सर्व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करावे.

गगनयानासाठी येणारा 10 हजार कोटी रुपयांचा खर्च जगाच्या दृष्टीने विचार करता खूप स्वस्त आहे. उदाहरणार्थ आपल्या शेजारी देश चीनने रशियाच्या मदतीने आपला नागरिक अंतराळात पाठवला तेव्हा चीनने आपल्या मानव मिशनवर तब्बल 18 हजार 350 कोटी रुपयांएवढी रक्कम खर्च केली होती.

अमेरिकेतील एका अंतराळ योजनेचा आजचा खर्च तब्बल 30 हजार कोटी रुपये असतो. चाळीस वर्षांपूर्वीही अमेरिकेने आपल्या अपोलो चांद्रयान मोहिमेवर 1 लाख 40 हजार कोटी रुपये खर्च केले होते. त्याशिवाय गेल्या 57 वर्षांमध्ये अमेरिकेने आपल्या अंतराळ मोहिमांवर 34 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसरीकडे रशिया आपल्या अंतराळ मोहिमांचा खर्च सार्वजनिक स्वरुपात जाहीर करत नाही. तरीही अंदाजानुसार एका अंतराळ मोहिमेवर रशिया 22 हजार कोटी रुपये खर्च करतो. यादृष्टीने पाहता गगनयानावर खर्च होणारे भारताचे 10 हजार कोटी रुपये ही रक्कम खूप मोठी नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की प्राधान्यक्रम आणि या मोहिमेतून मिळणारे ठोस फायदे काय?

भारताच्या या मिशनमध्ये अंतराळ प्रवाशांना सात दिवस अंतराळात राहावे लागणार आहे. अंतराळात प्रवाशांची निवड भारतीय हवाई दल करणार आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले जाईल. या मोहिमेसाठी वापरण्यात येणार्‍या रॉकेटची कमीत कमी दोन मानवरहित उड्डाणे होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम संपूर्णपणे स्वदेशी आहे. इस्रोने याचे काही तंत्रज्ञान विकसित केले आहे. जसे इस्रोने याआधी क्रू मॉड्यूल आणि बचाव प्रणाली (एस्केप सिस्टिम) चे परीक्षण केले आहे. इतर तयार्‍या येत्या काही टप्प्यात पूर्ण होतील. इस्रोने मंगळयानाव्यतिरिक्त आपल्या प्रक्षेपकातून परदेशी उपग्रह अंतराळात सोडल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. ते पाहता गगनयान या मोहिमेतून भारतीयांना अंतराळात पाठवण्याचे स्वप्न अशक्य नक्कीच नाही. दहा वर्षे इस्रोचे प्रमुख असलेले यु. आर. राव यांनी एका प्रसंगी असे म्हटले होते की, चीनची आव्हाने लक्षात घेता भारताला अंतराळात मानव मोहीम करण्याची गरज आहे. याचा अर्थ असा की, भारताने लवकरच अशी मोहीम हाती घेतली नाही तर अंतराळ तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये शेजारी राष्ट्र चीनबरोबर भारताला हार पत्करावी लागेल.

वास्तविक प्रश्न आहे तो अंतराळ संशोधन आणि संसाधनांच्या उपयुक्तततेचा. अमेरिका आणि रशिया यांच्यानंतर चीन या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. या मोहिमेंतर्गत चीन आता चंद्रावर माणसाला पाठवण्याची योजना आखतो आहे. अंतराळ क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी कोणताही देश अवकाशात मानव मोहिमा आखून आपली योग्यता आणि क्षमता सातत्याने सिद्ध करून दाखवतो. गेल्या काही वर्षांत इस्रोने अनेक यशातून आपली क्षमता जगासमोर सिद्घ केली आहे. यामुळेच संपूर्ण अंतराळ उद्योगामध्ये एक प्रकारे खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांदरम्यान अमेरिकेत खासगी अंतराळ उद्योगांनी आणि अधिकार्‍यांनी इस्रोच्या कमी खर्चिक प्रक्षेपण यानाशी करावी लागणार्‍या कडव्या स्पर्धेची चिंता व्यक्त केली आहे. सध्या माहिती तंत्रज्ञानापासून ते वातावरणाच्या अंदाजापर्यंत सर्वच गोष्टींसाठी व्यक्ती अंतराळात असलेल्या उपग्रहांवर अवलंबून आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही.

त्यामुळे माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योगानंतर अंतराळ प्रवास हा जगातील तिसरे क्षेत्र म्हणून समोर येत आहे. त्यामध्ये भारताला पश्चिम देशांसाठी आऊटसोर्सिंग करून चांगली कमाई होत आहे. इस्रोद्वारा उपग्रह प्रक्षेपण करण्याचा खर्च इतर देशांच्या तुलनेत 30-35 टक्क्याने कमी आहे. अर्थात इस्रोही या किमतीचा खुलासा करत नसले तरीही साधारणपणे प्रतिकिलोग्रॅमच्या हिशेबाने शुल्क आकारले जाते. भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी परदेशी उपग्रह आपल्या प्रक्षेपकांच्या मदतीने अंतराळात पाठवण्याचा उपक्रम हा पैसे मिळवण्याचा एक मार्ग आहे. अनेक युरोपिय देशांना इस्रोकडून उपग्रह सोडणे स्वस्त पडते. भारतीय प्रक्षेपकाच्या यशाची आकडेवारी खूप जास्त आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीने इस्रो उपग्रह आणि प्रक्षेपक निर्मितीचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्या प्रक्षेपकांच्या मदतीने विविध देशांचे उपग्रह प्रतिस्पर्धी किमतींवर अंतराळात सोडेल. इस्रोचे हे यश पाहूनच अमेरिकेच्या खासगी कंपन्यांची झोप उडाली आहे. अंतराळ संशोधन आणि व्यापार या क्षेत्रात भारत नवे नवे पराक्रम करेल आणि देशाच्या युवाशक्तीला सखोल संशोधन कार्याकडे वळवून त्यांना नोकरीच्या शोधात परदेशावर अवलंबून राहण्याची गरज नाही अशी स्थिती आणेल.
– श्रीनिवास औंधकर, ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ

LEAVE A REPLY

*