खूनामागे ‘गांजा’वाद

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरातील केकताई आश्रमातील साधू महाराज व खुनामागे गांजावाद असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डोक्यात दगड घालून ठार केल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर पाचरट टाकून ते जाळण्यात आले. गुरुवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदाम नामदेव बांगर (वय 55, रा. वडगाव गुप्ता) हे साधू महाराजांचे आणि यादव उर्फ बाबासाहेब बाबुराव कराळे (वय 55, रा. शेंडी, ता,नगर) असे मृत झालेल्या भक्ताची नावे आहेत.
गांजा ओढत असताना त्यांच्यात वाद झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत एक संशयीत आरोपी पोलिसांच्या रडावर असून त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याप्रकरणी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत बांगर हे गेल्या काही दिवसांपासून केकताई येथील आश्रमात पूजा करण्याचे काम करीत होते. त्यांच्या सोबत कराळे यांनी आश्रमातील पुजेसाठी स्वत:ला झोकून दिले होते. बुधवार ते गुरूवार या दरम्यान त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवित डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले. 24 तास दोघांचा मृतदेह आश्रमाच्या परिसरात पडून होता. काही भाविक तेथे दर्शनासाठी गेेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. स्थानिक नागरिकांनी ही घटना दुपारी पोलिसांना कळविली.
दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला. आश्रमाचा वाद, वैयक्तीक मतभेद किंवा आकस्मात घटना या दृष्टीने त्यांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे याबाबत कोणतेही पुरावे हाती आलेले नव्हते. घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील, पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी घटनास्थळाची पहाणी करुन तपासाच्या दृष्टीने सुचना केल्या.
कोट
मृतदेह पुण्यातील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. घटनेचे मूळ कारण अद्याप समजले नसून त्यासाठी पोलीस चौकशी सुरू आहे. लवकरच घटनेची उकल करण्यात येईल. कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.- आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक.

  घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. या घटनेची उकल करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून कोणताही पुरावा हाती नसताना आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच श्रीरामपूर, नगर तालुका अशा विविध ठिकाणी जाऊन आले. त्यांच्या हाती महत्वाचे धागेदोरे आले आहे. लवकरच हा गुन्हा उघड होईल अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

LEAVE A REPLY

*