खान्देशात उष्माघाताचे दोन बळी

0

जळगाव/धुळे |  प्रतिनिधी :  खान्देशात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून आज (दि.२९) रोजी दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आगामी काळात तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर निघतांना विशेष करुन काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

भुसावळात अनोळखी इसमाचा मृत्यू

जिल्ह्यातील भुसावळमधील एका शाळेजवळ दुपारी मयत अवस्थेत एक भिकारी मिळून आला. पोलीसांनी उष्माघातामूळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज लावला आहे. तर वैद्यकिय सुत्रांकडून शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे नेमके समजेल असे सांगण्यात आले आहे. चैत्राच्या सुरवातीलाच जिल्ह्यात वैशाख वणवा पेटला आहे.

तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहचला आहे. जिल्हात उष्माघाताचा ईशारा महसुल प्रशासनाने दिला आहे. यातच दुपारी १.३० वाजेच्या सुमारास भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील राधालाल शिकुंमल हायस्कुलच्या जवळ ४५ ते ५० वयोगटातील एक भिकारी मयत अवस्थेत पडलेला होता.

त्याला बाजार पेठ पोलीस ठाण्यातील सफौ. रफिक काझी व पोना दिपक पाटील यांनी जिल्हारुग्णालयात दाखल केले. पोलीसांनी त्या भिकारीचा मृत्यू भुकेमूळे किंवा उष्माघातामूळे झाल्याची नोंद केली असून त्यासंबधी शवविच्छदेन अहवाल मागविला आहे. दरम्यान, मयत ओळख पटविण्यासाठी तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर खरे कारण समजेल असे वैद्यकिय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी सांगितले.

शिरपूर तालुक्यात माजी सरपंचाचा मृत्यू

तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे यांचा उष्माघाताने दि.२९ मार्च रोजी दुपरी १.३० वाजता मृत्यू झाला. बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे (वय ४९) यांना ताप असल्यामुळे येथील खासगी दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले होते.

तेथे उपचार घेतल्यानंतर लगेच धुळ्याला अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. मात्र, दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांची अंत्ययात्रा ३० मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बाभुळदे येथील राहत्या घरापासून काढली जाणार आहे.

त्यांच्या पश्‍चात पती सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शं.पा.निकुंभे, दोन मुले व मुलग असा परिवार आहे. शिक्षक पतसंस्थेचे कर्मचारी राहूल निकुंभे यांच्या त्या मातोश्री होत.  जिल्ह्यासह तालुक्यात पहिला उष्माघाताचा बळी त्या ठरल्या आहेत.

मृत्यू उष्माघातानेच

येथील डॉ.पराग पाटील यांनी सदर महिलेच्या मृत्यूबाबत माहिती देतांना सांगितले की, दि.२८ रोजी त्यांना खोकला येत असल्यामुळे येथे आणले होते. त्यावेळी त्यांना ताप नव्हता. मात्र, दुसर्‍या दिवशी अचानक ताप वाढल्याने दवाखान्यात दाखल केले. त्यांचे शरीरात १०६ डिग्री ताप होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा.

LEAVE A REPLY

*