खाजगी सावकारा विरोधात जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार

0

कारभारी गवळी : गुंडेगावातील सावकार

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, सावकारी शोषणाविरुध्द जनआंदोलनाच्यावतीने काळी आई ताबा परती आणि खाजगी सावकाराची तुरुंग भरती मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष यमनाजी म्हस्के यांनी दिली. या मोहिमेतर्ंगत गुंडेगाव (ता.श्रीगोंदा) येथील खाजगी सावकाराच्या विरोधात महाराष्ट्र मनी लेंडिग रेग्युलेशन ऍक्ट 2014 नुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आली आहे.

 
सावकाराच्या तावडीतून शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी सावकारी शोषणा विरुध्द जनआंदोलन व विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला यश येवून महाराष्ट्र मनी लेंडिग रेग्युलेशन ऍक्ट 2014 अमलात आला. या कायद्यान्वये कलम 18 खाली सावकाराची चौकशी करण्याचा व कलम 48 खाली खटला भरण्याचा अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आला आहे. मुळ कर्जदार शेतकर्यांच्या तावडीतून जमीनी परत मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर चक्री आंदोलन करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात जिल्हा उपनिबंधकांनी अनेक प्रकरण निकाली काढत कर्जदार शेतकर्‍यांना जमीनी मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहे.

 
गुंडेगाव येथील शेतकरी रामदास भिसे याने सन 2013 मध्ये खाजगी सावकार खंडू भिसे यांच्याकडून 50 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. दुष्काळी परिस्थितीने कर्जाची परत फेड न झाल्याने 2 वर्ष 9 महिन्यांत 5 टक्के चक्रीवाढ व्याज दराने 1 लाख 85 हजार रक्कम झाली. सावकाराने पैश्यासाठी तगादा लावून, गट नं. 605 क्षेत्र 20 आर शेतजमीनचे खोटे खरेदीखत कर्जदार शेतकर्‍याकडून लिहून घेतले. खोटे खरेदीखत रद्द करुन सदर सावकारावर महाराष्ट्र मनी लेंडिग रेग्युलेशन ऍक्ट नुसार कारवाई करावी व कर्जदार शेतकर्‍याचा जमीनीवर ताबा कायम ठेवण्याची मागणी संघटनेच्यावतीने जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आली आहे.

 

पारनेर व जामखेड तालुक्यातील अनेक खाजगी सावकाराच्या तावडीतून जमिनी मूळ शेतकर्‍यांना मिळवून देण्यात संघटनेला यश आले आहे. शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता जमिनीसाठी सावकाराच्या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन यमनाजी म्हस्के यांनी केले. या मोहिमेसाठी पोपटराव गोरडे, कायदे सल्लागार अ‍ॅड. कारभारी गवळी, रविंद्र भिसे प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*