खरे सुख भगवंतांच्या भक्तीत

0

अरुणनाथगिरी महाराज यांचे प्रतिपादन

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – संसारात सुख नाही, सुख भगवंताच्या भक्तीत आहे. संत भगवान व भक्त भेटीचे कार्य करतात. संत सन्यासी असावेत; पण ग्रहस्थाश्रमी संतही भगवंताला आवडतात. कारण संतांची संतती क्रांती करते, असे प्रतिपादन भागवताचार्य अरुणनाथगिरी महाराज यांनी केले.
चितळी येथील श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त उपस्थित भाविकांना उपदेश करताना ते बोलत होते.

 
अरुणनाथगिरी महाराज म्हणाले, भक्त प्रल्हाद असो की सुकदेवमुनी अथवा चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू. या सर्वांवर आईच्या गर्भात असताना सात्वीक संस्कार झाले. त्यामुळे जन्मानंतर त्यांनी क्रांती केली. भगवंताला अभिप्रेत असलेले संस्कार संत सहवासात होतात. हजारो वर्ष इच्छारुपी विमानात भ्रमण करणारे ऋषी कर्मदनी ज्यावेळेस समाधीतून बाहेर येतात, त्यावेळी हजारो वर्ष त्यांची सेवा करणार्‍या देहूती या पत्नीला आपण कोण? म्हणून प्रश्‍न केला.

 
पत्नीने आपली ओळख देऊन संतती प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांना 9 क्रांतीकारी मुली झाल्या. त्यामध्ये सती, अनुसया, अरुंधती यांचे कार्य जगासमोर आहे. तसेच 10 वा मुलगा भगवान कपिल याच्या जन्मानंतर त्याने देहूती मातेला भक्तीची महती सांगितली. राजा इंद्राने ज्यावेळी हिरण्यकशपूची पत्नी कयाधू माता गर्भावस्थेत असताना पळवून नेण्याचे दु:साहस केले.

 

त्यावेळी महर्षी नारद मुनींनी राजा इंद्राला अडविले. इंद्राने मुनींचे दर्शन घेतले. संतांना देवही नमस्कार करीत होते.

 
नारद मुनींनी कयाधू मातेला सोडून देण्याचा आदेश केला. त्यानंतर इंद्राच्या भीतीमुळे माता कयाधूला आश्रमात आश्रय दिला. तेथे माता कयाधूच्या पोटात असलेल्या बाळावर नारायण-नारायण नामस्मरणाचे संस्कार झाले. जन्माला आलेले भक्त प्रल्हाद भगवंत नारायणाचे प्रिय शिष्य बनले.

 

पुढे पिता हिरण्यकशपूने भक्त प्रल्हादला नारायणाचे नामस्मरण करतो म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दंडीत केले. परंतु भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे उन्माद झालेल्या हिरण्यकशपूचा वध करण्यासाठी भगवंताने नरसिंह अवतार घेतला. भक्तांसाठी भगवंताने 24 अवतार घेतले. त्यातील प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण अवतार पुजनीय ठरले, असल्याचे महाराज म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*