Type to search

ब्लॉग

खरेदी करा; पण सावधपणे!

Share
सण जवळ येतात तसे बाजार सजायला लागतात. सर्वत्र जाहिराती झळकायला लागतात. ग्राहकांना खुणावू लागतात. या काळातील खरेदी बाप्पासाठी असो वा सणानिमित्त घर-कुटुंबासाठी, ती करायला हवीच. मात्र खरेदीला निमित्त शोधणार्‍या आबालवृद्धांसाठी हा काळ म्हणजे सावधगिरी बाळगण्याचा असतो; पण लक्षात कोण घेतो?

‘एक गाव एक पाणवठा’ अशी एक अतिशय समाजाभिमुख चळवळ काही वर्षांपूर्वी जोमात होती . सामाजिक अभिसरणाचे ते एक छान प्रारूप होते. गणेशोत्सव जवळ येऊ लागला की त्या उपक्रमाची हटकून आठवण येते. वाटते, ‘एक गाव एक गणेशोत्सव’ असे झाले तर किती चांगले होईल. ‘एक गाव एक गणेशोत्सव’ या सूत्रावर गणेशोत्सव साजरा करणारे रोहे गाव महाराष्ट्रात आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे रोह्यात सगळ्या गावाचा एकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. गेल्या काही वर्षांत गावाची वस्ती वाढली. गावसुद्धा सगळीकडून वाढले; पण नवीन पिढीनेही एकाच गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवली आहे. अत्यंत अनुकरणीय असा हा उपक्रम मध्यम आकाराच्या गावागावांनी अनुकरण करावा असाच आहे. शहरातसुद्धा काही मर्यादा असायला हवी. अनेक जागरुक ग्राहकांनी वैयक्तिक पातळीवर पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती व पर्यावरणपूरक सजावट यासारखी पावले उचलली आहेत. त्यामुळे सजावटीचे नवीन साहित्य बाजारात उपलब्ध होत आहे. तसेच गणेशमूर्तीची निवड करतानाही सजगता दिसत आहे. शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा विविध ठिकाणी आयोजित होत आहेत. अनेक घरांत नवीन पिढी ‘आपला बाप्पा घरीच बनवणार’ असा आग्रह धरत आहेत.

या मुलांना आपण उत्तेजन दिले पाहिजे. त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात गेल्या काही वर्षांपासून ‘पर्यावरण रक्षण’ विषयाचा अंतर्भाव झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून घराघरांत नवी पिढी पर्यावरणविषयक जागरुकता दाखवत आहे. त्याला मोठ्यांनी हातभार लावायला हवा. निर्माल्य कलश, निर्माल्यापासून खत, मोजक्याच फुलांची आरास व समईची ज्योत ही परंपरा जोपासण्यात निसर्गरक्षण होते. सण-उत्सव म्हणजे आपल्या ऐहिक वैभवाचे प्रदर्शन करण्याची संधी व त्यासाठी भरपूर खरेदी हे गेल्या काही दशकातील समीकरण जाणीवपूर्वक बाजूला ठेवायला हवे. सण जवळ येतात तसतसे बाजार सजायला लागतात. सर्वत्र जाहिराती झळकायला लागतात आणि ग्राहकांना खुणावू लागतात. यंदा काय नवीन खरेदी? मग ती बाप्पासाठी म्हणून असो की त्या सणानिमित्ताने घरासाठी, कुटुंबासाठी, करायला हवीच! बाप्पापाठोपाठ गौराबाई येतात. नंतर आश्विनात नवरात्र, मग दिवाळी! खरेदीला निमित्त शोधणार्‍या तमाम आबालवृद्धांसाठी हा काळ सावधगिरी बाळगण्याचा असतो; पण लक्षात कोण घेतो? या गडबडीत आणखी एक भर खाद्यपदार्थ खरेदीची. बाप्पासाठी नैवेद्याला स्वयंपाकघरात स्वहस्ते चार पदार्थ बनतात आणि त्यानिमित्त कुटुंबात दोन-तीन पिढ्या एकत्र येतात. मात्र गेली काही वर्षे दर्शनाला येणार्‍या नातेवाईक, मित्र-मंडळींना प्रसादाबरोबर आणखी खाऊ द्यायची पद्धत रुजली आहे. आता या सार्‍यांसाठी आणि इतर वेळीसुद्धा बाजारातील तयार खाद्यपदार्थ विकत घेण्याकडे वाढता कल दिसतो. बाप्पासाठी खव्याचे मोदक, पेढे बर्फी वगैरे घेताना आपण असा विचार करतो का की, या दोन-चार दिवसांत एकदम इतका मावा कसा तयार झाला? ही मिठाई ताजी असेल का? ती कुठून आली असेल? तिचा रंग इतका गडद केशरी कसा झाला? केशर किती महाग आहे. मग या मिठाईत रंग घातला असणार. तो चांगला असेल ना? जिलेबी काही अगोदरपासून बनवत नसतील. मग आपण ती घ्यावी का? छे छे! गणपतीला कुणी जिलेबी नेतात का? मग काजू मोदक? त्यात काजू किती व बाकी काय असेल?

जागरुकपणे खरेदी करणार्‍याला अनेक प्रश्न पडतात. त्यातून कधी सुका मेवा अगर चक्क घरगुती खिरापत बनवून ठेवली जाते; पण येणार्‍यांना डिशमध्ये वेफर्स, बेसन लाडू किंवा समोसा असे जे काय दिले जाते ते तर बाजारातून तयार आणलेले असते. गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या डिशमध्ये घरी केलेले अगर विकतचे शुद्ध तुपातले, कोलेस्टेरॉलविरहित ‘शुगरफ्री बेसन लाडू’ (म्हणजे एकदम आरोग्यस्नेही!) येतात तेव्हा लक्षात येते की अनेक उच्चविद्याविभूषित खवय्यांना हे माहीतच नसते की कोलेस्टेरॉल थेट अन्नातून आपल्या पोटात जाते ते सामिष पदार्थांतून. शाकाहारी पदार्थांत ते नसते आणि आपले शरीर कोलेस्टेरॉल बनवते. शुगरफ्री हे एक रसायन आहे आणि मधुमेह असेल तर हे रसायन म्हणजे ‘खा लाडू पोटभर’ असा परवाना नव्हे.

तसेच मधुमेह नसेल तर अटकर बांधा राखण्याचा तो उपाय नव्हे. तर सजग आणि उत्तरे शोधणार्‍या, सणासुदीला खाण्याचा आनंद योग्य प्रकारे लुटू पाहणार्‍यांसाठी काही उपाय सुचवता येतात. मिठाई घेताना भडक रंग (हिरवीगार बर्फी, अतिकेशरी जिलेबी, पिवळेधम्मक पेढे) टाळावेत. रासायनिक रंग अखाद्य नसतात; पण त्यांचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो. पॅकेज्ड पदार्थ घेताना भोक पडलेला, फुगलेला, शिवणीशी उसवल्यासारखा अगर तारीख उलटून गेलेला पॅक दिल्यास विकत घेऊ नये. तारीख उलटलेले पॅकेज्ड पदार्थ विकणे हा गुन्हा आहे.जागरुक ग्राहकाची ही जबाबदारी ठरते की अयोग्य प्रथा, माल इ. लक्षात आल्यावर त्याविषयी तक्रार करावी. त्यामुळे इतर अनेक ग्राहकांचे नुकसान टळते. बेफिकीर विक्रेत्यांना जरब बसते. गृहउद्योगातर्फे बनवण्यात येणारे सणासुदीचे पदार्थ, खास करून शेव-चकली-कडबोळी आदींसाठी चांगले तेल वापरले नसेल, लाडू-करंज्या आदींसाठी ताजे पीठ आणि तूप वापरले नसेल तर विशिष्ट वास येतो, चवही कळते. आपली रसना मात्र तयार हवी.

सगळा अन्नव्यवहार अन्न-औषध प्रशासनाच्या अंतर्गत येतो. प्रत्येक जिल्ह्याला अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय असते. यात कोपर्‍यावरच्या वडापावाच्या टपरीपासून पंचतारांकित हॉटेलपर्यंत आणि घरगुती पातळीवर, बचतगटांनी बनवलेल्या पिठं, तयार खाऊ इत्यादींपासून मोठ्या अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत सर्व प्रकारचे अन्न, अन्नघटक, उत्पादनपूर्व दर्जा परीक्षण, उत्पादनाचे दर्जा परीक्षण, अनुचित प्रकार आढळल्यास त्यावर कारवाई अशी अनेक कामे अंतर्भूत असतात. आपण त्यांचा उपयोग केला पाहिजे. तसेच अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार आणि वैधमापन नियमानुसार अन्नाच्या वेष्टनावर दिलेली माहिती समजून घेणे आणि नंतर खरेदी करणे योग्य ठरते.
(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागप्रमुख आहेत.)
– वसुंधरा देवधर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!