खंडाळ्यात मुलीवर सामूहिक अत्याचार

0

मुलीला दिवस गेल्याने प्रकरणाचा उलगडा, तिघांना अटक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – एका अल्पवयीन मुलीस नारळ देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर एका नराधमाने अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील खंडाळा येथे घडली. एवढेच नव्हे तर हा प्रकार पाहणार्‍या अन्य दोन जणांनी तिला ‘आम्ही तुझं हे बिंग फोडू, तुझ्या आजोबांना हा प्रकार सांगू’ अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
खंडाळ्यात घराच्या पाठीमागे मोटारीचे पाणी भरण्यासाठी संबंधित अल्पवयीन मुलगी गेली असता त्या ठिकाणी रामराव गिरणारे तिच्याजवळ गेला आणि तुला नारळ देतो असे सांगून तिला मक्याच्या पिकाशेजारील नारळाच्या झाडाकडे घेऊन गेला.त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या आई, आजोबांना मारून टाकीन अशी त्याने जाताना धमकी दिली.
या धमकीच्या भीतिपोटी त्या मुलीने कोणालाही काहीही सांगितले नाही. पुन्हा चार पाच दिवसांनी ती अत्याचारित मुलगी पाणी भरण्यासाठी गेली व पुन्हा त्या ठिकाणी रामराव गिरणारे याने ओढून अत्याचार केला. त्या दिवशी हा प्रकार राहुल सुभाष शिरसाठ व सचिन अण्णा निकम या दोघांनी पाहिला. त्यानंतर चार पाच दिवसांनी सचिन निकम व राहुल शिरसाठ हे दोघेही दुपारच्यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या घरी गेले. या प्रकाराचा बोभाटा करून आईला व आजोबांना सांगू अशी धमकी देत दोघांनाही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगू नकोस नाही तर मारून टाकू अशी धमकीही दिली. त्यामुळे ती मुलगी पुन्हा शांत राहिली. निर्ढावलेल्या या तीनही आरोपींनी वेळोवेळी धमकी देऊन पुन्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रामराव गिरणारे, राहुल सुभाष शिरसाठ व सचिन अण्णा निकम या तिघांविरुद्ध भादंवि कलम 376 (2), आय. एन., 376 (ड), यांच्यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व अधिनियम 2012 चे कलम 4, 5 चे कलम (जे) (2) व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. अत्याचारित मुलीचे कुटुंब हे खानदेश चाळीसगाव भागातील राहणारे आहे. ते काही वर्षांपासून कार्पोरेशनच्या कामासाठी येथे आले असून ते येथेच राहत आहे. या घटनेमुळे गावात चीड व्यक्त करण्यात आली असून अशा आरोपींना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

दवाखान्यातून थेट पोलिसांत…
दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचे पोट दुखू लागले. पोट दुखत असल्याचे तिने आईला सांगितले. तिच्या आईने तातडीने तिला जर्मन हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यावेळी तिला दिवस गेले असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सागितले. तेव्हा त्या अत्याचारित मुलीने तिच्या आईला झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे संतापून जात त्या मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठले.

LEAVE A REPLY

*