क. का. वाघ स्मृती व्याख्यानमाला : देशाच्या विकासात माहिती तंत्रज्ञाचे योेगदान

0

नाशिक : आज जगात सर्वाधिक माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर भारतात होत आहे. या क्षेत्रात मागील दोन शतकात भारताने मोठी झेप घेतली आहे. त्याद्वारे रोजगार, विकासाभिमुख कामे, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. एकंदर भारताच्या विकासात आयटीचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केपीआयटी संस्थेचे संचालक किशोर पाटील यांनी येथे केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिनिमित्त व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, 90 च्या दशकात जागतिक स्पर्धेत भारतास टिकण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञाची गरज ओळखून तत्कालीन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी या क्षेत्राचा पाया घातला. जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागल्यानंतर आयटी क्षेत्राचे तंत्रज्ञानदेखील भारतात येण्यास सुरुवात झाली.

भारताने हार्डवेअर, तसेच सॉफ्टवेअर या क्षेत्रात प्रगती करून जागतिक पातळीवर स्वत:चे नावलौकिक प्राप्त केले आहे, या सर्व तंत्रज्ञानाचा योग्य असा वापर करत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने खेडी शहराशी जोडली गेली, गावांचा विकास झाला, देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक, दळणवळण यांसह विविध क्षेत्रांचा विकास होण्यास आयटी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रास्तविक करताना प्राचार्य गायकवाड म्हणाले, आयटी क्षेत्रात विद्यार्थ्यांना फार मोठ्या संधी आहेत. कोणत्याही क्षेत्रात काम करताना ते प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. भविष्याचा वेध, तसेच आपली आवड लक्षात घेऊन करिअर करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या युगात स्वत:चे कौशल्य वापरल्यावर टिकाव लागतो तसेच प्रगती साधता येत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर हे होते तसेच क. का. वाघ महाविद्यालयाचे संचालक बाळासाहेब वाघ, प्राचार्य डॉ. व्ही. एम. सेवलीकर, प्रा. अनुराधा नांदुरकर, प्रा. अर्चना बेंडाळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सोनल जोशी, अनघा कन्नव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अर्चना कोते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*