क्षणोक्षणी हाचि करावा विचार…!

0

कठीण काळामध्ये आपण स्वतः प्रचंड शिकत असतो तो काळ त्रासदायक असल्या तरी त्या काळातच आपल्यातील खरी क्षमता उदयास आलेली असते. आपण नेमकं कशासाठी जगत आहोत? हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला विचार करायला लावणारा आहे.

त्याचे उत्तर आहे आयुष्याच्या प्रवासाचा एकमेव उद्दिष्ट म्हणजे सर्वांगीण विकास. तो स्वतःचा असो परिसराचा असो वा समाजाचा असो. सर्वांगीण विकास हा प्रत्येकाचा झालाच पाहिजे. आपण जन्माला आल्यानंतर कळत नकळत आपला विकास होत असतो. त्यासाठी आपण जन्माला आलो आहोत.

आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला लिहिता, वाचता, बोलता येत नसते. परंतु आईच्या सानिध्यात राहून अनुकरण करून आपण हळूहळू शिकायला लागतो. आपल्या शरीराची हालचाल करता येत नाही पण कालांतराने आपल्याला चालता फिरता व धावता देखील येते. आपण आपल्या कृतीमध्ये, विचारांमध्ये, ज्ञानामध्ये, कौशल्यांमध्ये सतत विकास करण्यासाठी अस्तित्वात आलो आहोत. हे करत असताना आपण फक्त स्वतःचा विकास नाही करत ,तर कुटुंबाचा, समाजाचा ,राष्ट्राचा व कळत नकळत जगाचाही विकास करत असतो.

जी माणसं ध्येयवादी नसतात अशा माणसांचा एक विशिष्ट कालावधीनंतर विकास होत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की जे काही साध्य करायचं होतं ते आपण केलेला आहे.

उदाहरणार्थ शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, मुलं, त्यांचे शिक्षण, स्वतःची निवृत्ती इत्यादी सर्व जबाबदार्या पूर्ण करणे हे काम अंतिम उद्दिष्ट असत. ते आपल संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट जगतात. आपलं संपूर्ण आयुष्य ते एका सामान्य माणसाप्रमाणेच जगतात. त्यांच्या क्षमतांचा विकास कधी होतच नाही.

आपण सर्वात समाधानी कधी असतो? जेव्हा आपला कोणत्या ना कोणत्या बाबतीत विकास झालेला असतो. आपल्या स्नेहसंबंध मध्ये, कामांमध्ये, आरोग्यामध्ये, ध्यानामध्ये व इतर बर्‍याच गोष्टींमध्ये जेव्हा आपला विकास होतो तेव्हा आपल्याला आनंद वाटतो, आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो व आपण आणखी उत्साही बनतो व नवीन काम करण्यास हुरूप येतो.

विकास होणे हे जरी आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा असलं तरी, विकास होण्याची प्रक्रिया मात्र खडतर असते हे देखील तेवढेच खर आहे. आयुष्यातील कोणत्या घटनेमुळे ,परिस्थितीमुळे ,किंवा कालावधीदरम्यान स्वतःमध्ये आमूलाग्र विकास झाला? आयुष्यातील तो फार सोपा होता का? याची आठवण करा. कठीण काळामध्ये आपण स्वतः प्रचंड शिकत असतो. तो काळ त्रासदायक असला तरी त्या काळातच आपल्यातील खरी क्षमता उदयास आलेली असते. मग आपण आयुष्यातील कठीण प्रसंगांना का घाबरतो? आपल्यासमोर एखादं संकट आलं तर का कमजोर?किंवा भूतकाळात घडलेल्या कठीण प्रसंगात बाबत नकारात्मक विचार का करतो? ते प्रसंग आपला विकास होण्याआधीच घडलेले असतात. कारण त्यांनी आपल्याला वैचारिक ,भावनिक,

आर्थिक असा कोणत्या ना कोणत्या प्रकारे विकसितच केलेलं असतं. आपल्या गुरूबद्दल जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कोणते विचार आपल्या मनात येतात? नक्कीच चांगले व सकारात्मक विचार यायला पाहिजे. आपल्या गुरूप्रमाणे आपल्या आयुष्यातील आव्हानात्मक प्रसंग आपल्याला कळत नकळत घडवत असतात. त्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान करायला शिकलं पाहिजे. आपल्या आयुष्यात सतत विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक क्षणातून काहीना काही विचार आपण आत्मसात केला पाहिजे. असं समजायला पाहिजे देवाने आपले आयुष्य आपल्यासाठी खास निर्माण केलेली एक वैयक्तिक विद्यापीठ आहे.

या विद्यापीठाचे आपण एक होतकरू विद्यार्थी व्हायला पाहिजे. सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्याला आधी धडा शिकवला जातो आणि नंतर परीक्षा घेतली जाते. परंतु आयुष्याच्या विद्यापीठांमध्ये आधी आपली परीक्षा घेतली जाते व मग आपल्याला धडा शिकवला जातो. परीक्षा द्यायला जर तयार असाल तरच स्वतःचा विकास होईल, समाजाचा विकास होईल, परिसराचा विकास होईल अन्यथा आयुष्यात समाधान वाटण्यासारखे काहीही नसेल. तर मग सृष्टीच्या निर्मात्याने आपल्यासाठी खास आयोजित केलेल्या परीक्षेला तोंड द्यायला आपण तयार राहिलेच पाहिजे.
– मो. 9421523840
– ललितकुमार नीळकंठ फिरके

LEAVE A REPLY

*