‘क्रेडाई महाराष्ट्र’ राज्य अध्यक्षपदी शांतीलाल कटारिया

नाशिकमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ; नूतन कार्यकारिणी जाहीर

0

नाशिक : ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या राज्य अध्यक्षपदी पुण्यातील शांतीलाल कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी कटारिया यांची निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष प्रशांत सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा पार पडली. यावेळी सन २०१७ ते २०१९ या दोन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

 

यामध्ये क्रेडाई नॅशनलचे राष्ट्रीय संघटनेचे कार्यकारी समिती सदस्य व पर्यावरण समिती अध्यक्ष तसेच क्रेडाई पुणे मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी कोल्हापूरच्या राजीव पारीख, प्रमोद खैरनार पाटील (औरंगाबाद), महेश साधवानी (नागपूर), रसिक चौव्हाण (नवी मुंबई) यांची निवड झाली.

नाशिकचे सुनील कोतवाल यांची मानद सचिवपदी तर पुण्याच्या अनुज भंडारी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी राज्यातील ४१ शहरामधील सदस्य आणि क्रेडाई नाशिकचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी परवडणारी घरे, डिजिटल मार्केटिंग, मंदीच्या वातावरणात व्यवसाय करण्याची कला आदी विषयांना अनुसरून चर्चा करण्यात आली.

क्रेडाई संघटनेशी जवळपास २६०० बांधकाम व्यावसायिक जोडले गेले आहेत. संस्था सरकारी व निमसरकारी संस्थांमार्फत व्यावसायिकांचे प्रश्न सोडविणे, गृहनिर्माण धोरण निर्मितीत सहभागी होणे यांसारख्या पद्धतीचे कार्य ही संस्था पार पाडते.

संस्थेच्या ३० वेगवेगळ्या क्षेत्रात समित्या कार्यरत असून दर तीन महिन्यांनी संस्थेची राज्यातील ठराविक शहरांत सभा पार पडतात.

राष्ट्रीय व राज्य पातळीवरचे प्रतिनिधीत्व नाशिककडे : क्रेडाई नाशिकचे तथा क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांचे येणाऱ्या नूतन राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी उपाध्यक्ष तथा सहसचिव या पदांसाठी नामनिर्देशन पाठविले आहे. तसेच क्रेडाई नाशिकचे विद्यमान अध्यक्ष सुनील कोतवाल यांची क्रेडाई महाराष्ट्राच्या मानद सचिव ह्या अतिशय महत्वाच्या पदावर अध्यक्षांनी निवड केली आहे. तसेच क्रेडाई नाशिकचे मानद सचिव उमेश वानखेडे यांची महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी प्रदर्शन समितीच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*