क्रीडा संकुलासाठी आवश्यक क्रीडा साहित्य लवकरच

0
नंदुरबार / शहादा तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक क्रीडा साहित्य जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शहादा तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. रावल यांचे हस्ते आज सकाळी झाला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, तालुका क्रीडा संकुलासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून 86 लक्ष रुपये खर्चून क्रीडा संकुलांतर्गत भितींच्या कुंपणाचे काम, इनडोर हॉल, 200 मीटर धावनपथ, खेळाचे मैदान, बॉस्केटबॉल कोर्ट, कार्यालय आदी कामे करण्यात आली आहेत.
गेल्या काही वर्षात मुले मैदानावर खेळण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाईल गेम खेळू लागले आहेत. तालुका क्रीडा संकुल झाल्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी क्रीडा संकुलाची जबाबदारी वाढली आहे.

समाजानेही मानसिकता बदलत मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
भारताने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. तशीच प्रगती क्रीडा क्षेत्रातही अपेक्षित आहे.

आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्य शासनाने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी त्यांना अत्याधुनिक अशा सोयी-सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल.

आदिवासी भागात चांगले खेळाडू पुढे येत आहेत. शहादा तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यमातून भविष्यात उदयोन्मुख खेळाडू पुढे येतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.

तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाडू, क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमी नागरिकांनीही योगदान द्यावे. शहादा शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

 

LEAVE A REPLY

*