क्रीडा ऍप अवतरतेय! जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राची इत्यंभूत माहिती

0

नाशिक | दि. ७ सोमनाथ ताकवाले- जिल्ह्यातील सर्व क्रीडा प्रकारातील क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संस्था, शासकीय उपक्रम, जिल्हा क्रीडा विभागाकडून आयोजित स्पर्धा वेळापत्रक आणि क्रीडा क्षेत्रातील इत्यंभूत माहितीचे संकलन असलेले ‘स्मार्ट क्रीडा ऍप’ लवकरच अवतरणार आहे. जिल्हा क्रीडा विभागाने त्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागासह शहर आणि ग्रामीण भागातील क्रीडापटूंनी नाशिकचे नाव राज्य, राष्ट्र स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे. त्यामुळे नाशिकचे क्रीडा क्षेत्र जागतिक पातळीवर चमकत आहे. मात्र अशा क्रीडापटूंची संख्या, त्यांची सद्यस्थितीत तयारी आणि त्यांना मिळत असलेले सहाय्य याबाबत माहिती गुलदस्त्यात असते.

तसेच अनेक नोंदणीकृत क्रीडा संस्था जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून इनडोअर, आऊटडोअर क्रीडा स्पर्धांचे प्राथमिक ते राष्ट्रीय स्तर आयोजन करीत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरू असलेल्या स्पर्धांची माहिती पुरेशा प्रसिद्धीमुळे क्रीडाप्रेमींना उपलब्ध होत नाही.

शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि क्रीडा संस्थांच्या हंगामी स्पर्धाही होत असतात. त्यांचे वेळापत्रक, नियोजन आणि त्यात मिळालेले यश यांची माहिती एकाच जागी संकलित असलेल्या माध्यमांचा आणि व्यासपीठाची उणीव होती. त्यामुळे जिल्हा क्रीडा विभागाला याबाबत अनेकदा क्रीडापटू, खेळप्रेमी आणि संस्थांकडून माहितीसाठी आग्रह केला जात होता.

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी असावी आणि तिचे संकलन आणि आदान-प्रदान आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे व्हावे यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा ऍप विकसित करण्याचा संकल्प केला होता. त्यावर अनेक दिवसांपासून काम सुरू होते. येत्या आठवडाभरात क्रीडा ऍप लॉंच होणार असून त्यामुळे क्रीडा क्षेत्राला इत्यंभूत माहिती चुटकीसरशी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिली.

ऍपमध्ये खेळाडूंसह क्रीडा प्रकार त्याचबरोबर सामन्यांचे झालेले आयोजन, आयोजित स्पर्धांचे वेळापत्रक, आगामी स्पर्धा, क्रीडापटूंची खेळनिहाय माहिती, मैदानी, वैयक्तिक क्रीडा प्रकार, व्हिडीओ क्लीप, क्रीडा मार्गदर्शक, अधिकृत क्रीडा संस्था, शाळांमध्ये क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था, तालुका, विभागस्तर क्रीडांगणावरील क्रीडा सुविधा, प्रशिक्षणाची तयारी, मार्गदर्शक आणि क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंच्या मुलाखतींचे भागही या ऍपमध्ये असणार आहेत. त्यामुळे क्रीडा ऍप हे सर्व क्रीडाप्रेमींना एक माहितीचे दालन आणि उभारत्या खेळाडूंना तयारी करण्याचे अचूक साधन मिळणार आहे.

नाशिकमध्ये तालुकानिहाय क्रीडा संकुले आहेतच पण त्याचबरोबर विभागीय क्रीडा संकुलही उभारण्यत आले आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे. त्यामुळे खेळ संस्कृती चांगली वाढली आहे. आयोजित होणार्‍या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडापटूंची जडणघडण होत आहे. त्यामुळे नाशिकच्या खेळ संस्कृतीची प्रचिती स्मार्ट ऍपमुळे अजून वाढेल, असे मत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*