कौतुकास्पद ‘राखी विथ खाकी’

0

पोलीस खात्याला समाजाभिमुख चेहरा देण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्तालय नेहमीच प्रयत्नशील असते. विविध सामाजिक उपक्रम आणि चळवळीतही नाशिक पोलिसांचा सहभाग आढळतो. महिला सुरक्षेसाठी ‘निर्भया पथका’सारखे उपक्रम राबवले गेले आहेत.

महिलांना मानसिकदृष्ट्या सबल बनवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने आणखी एक पाऊल उचलले आहे. ‘राखी विथ खाकी’ हा उपक्रम यंदाच्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आला आहे. आजचा जमाना अंतर्जाल (इंटरनेट), चलबोल (मोबाईल) आणि समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) आहे. त्यामुळे संवाद साधणे झटपट आणि सुलभ झाले आहे.

मात्र, हीच साधने महिलांच्या त्रासाला कारण ठरत आहेत. समाज माध्यमांवरून महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांतून होणार्‍या त्रासांबद्दल महिलांच्या तक्रारींची संख्याही वाढत आहे. अशावेळी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा हा उपक्रम अभिनव म्हटला पाहिजे. या उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधनानिमित्त महिलांनी पोलिसांना राखी बांधायची आहे.

राखी बांधल्यावर पोलिसांसोबतची स्वछबी (सेल्फी) काढून आयुक्तालयाने दिलेल्या क्रमांकावर सोमवारपर्यंत म्हणजे आज दिवसभरात पाठवायची आहे. अशा उपक्रमांनी पोलिसांबद्दल महिलांमध्ये बंधूभाव वाढीला लागेल व ‘खाकीवर्दीतील माझा भाऊराया कायम माझ्या साथीला आहे’ अशी भावना दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्तालयाने ‘ट्विटर’वर व्यक्त केला आहे.

या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही महिलांना करण्यात आले आहे. विविध प्रकारचे गुन्हे, त्याबाबतच्या तक्रारी, गुन्हेगारांचा छडा लावून त्यांच्या मुसक्या आवळणे, त्यांना न्यायालयात हजर करणे, वाहतूक नियमन यासारख्या कामाच्या धबडग्यातसुद्धा ‘राखी विथ खाकी’सारखे कल्पक उपक्रम राबवण्याची नाशिक पोलिसांची ऊर्मी निश्चितच स्वागतार्ह आहे. असा उपक्रम राज्यभर राबवण्यासारखा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडून महिला सहकार्‍याचा छळ होण्याचे प्रकार राज्यात काही ठिकाणी उघडकीस आले आहेत.

ठाणे ग्रामीणच्या एका पोलीस अधिकार्‍याने तर महिला अधिकार्‍यास जीवे मारून टाकल्याची घटना घडली. म्हणूनच महिलांसाठी उपक्रम राबवताना राज्यातील सर्वच पोलिसांना आधी काही बाबतीत सावध केले पाहिजे. पोलीस खात्यातील ‘रोगट’ रोपटी निर्दयपणे उपटून फेकावी लागतील. तरच ‘राखी विथ खाकी’सारखे उपक्रम खर्‍या अर्थाने सार्थ ठरतील.

LEAVE A REPLY

*