Type to search

ब्लॉग

कोवळ्या जीवांची घुसमट!

Share

वायू प्रदूषणाने 2016 मध्ये भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमधल्या 98 टक्के बालकांवर दुष्परिणाम झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतातील पाच वर्षांच्या आतील सुमारे 60 हजार 987 मुलांचा मृत्यू प्रदूषणामुळे झाला असून हा आकडा जगात सर्वाधिक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2016 मध्ये भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या 98 टक्के मुलांवर हवेतील अतिसूक्ष्म कणांनी निर्माण केलेल्या प्रदूषणाचा घातक परिणाम झाला आहे. भारतात 2016 मध्ये 1 लाख 10 हजार मुलांच्या मृत्यूचा संबंध हवेच्या प्रदूषणाशी आहे. पाच वर्षांच्या आतील मुलांच्या मृत्यूच्या संख्येत भारताने जगातील सर्व देशांना मागे टाकले आहे. डब्ल्यूएचओच्या मते, पाच वर्षांच्या आतील 60 हजार 987 मुलांचा मृत्यू ‘पीएम 2.5’मुळे झाला आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. दुसर्‍या क्रमांकावर नायजेरिया तर तिसर्‍या क्रमांकावर पाकिस्तान आहे. भारतात 2016 मध्ये 20 लाख नागरिकांचा मृत्यू विषारी हवेमुळे झाला आहे.

श्वास गुदमरून टाकणार्‍या हवा प्रदूषणात भारतातील महानगरांमधील स्थिती बिकट होत आहे. हवेत मिसळत असलेल्या विषारी वायूंमुळे श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा शिल्लकच उरलेली नाही. दिल्ली आणि आसपासचा परिसर तर प्रदूषणाच्या धोकादायक पातळीने ग्रस्त आहे. महानगरी मुंबईची अवस्था आपण पाहतोच आहोत. गेल्या काही वर्षांत न्यायालयानेही विषारी हवेच्या बाबतीत अनेकदा गंभीरपणे चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीत प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढलेला असतानाच आणखी एक अभ्यास अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार भयावह नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन सर्वाधिक होणारे जगातील तीन सर्वात मोठे ‘हॉटस्पॉट’ भारतात आहेत. यातील एक ‘हॉटस्पॉट’ राजधानी दिल्ली हाही आहे. हे असे ‘हॉटस्पॉट’ आहेत ज्या ठिकाणी हवेत मिसळलेला पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) म्हणजेच अतिसूक्ष्म कणांचा भागच प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरला आहे.

हवेत तरंगणारी ही घातक रसायने आणि विषारी वायू मानवी शरीरासाठी आत्यंतिक हानिकारक आहेत. सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, लहान मुलांच्या मृत्यूचे कारण ‘पीएम-25’ हेच आहे. हा अतिसूक्ष्म कणांचा हिस्सा प्रदूषणामुळे झपाट्याने वाढत चालला आहे. वातावरणात आढळणार्‍या पीएम-25 कणांशी संबंधित वायू प्रदूषणासंदर्भात अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठात एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार श्वासाबरोबर हे अतिसूक्ष्म कण थेट फुफ्फुसात जातात आणि त्यामुळे हृदयविकार, श्वसनाशी संबंधित आजार, त्वचाविकार, दमा आणि कर्करोगासारखे जीवघेणे आजार होण्याचा गंभीर धोका असतो. ‘लेन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, पीएम-2.5 हे अतिसूक्ष्म कण मधुमेहालाही कारणीभूत ठरतात. पीएम-25 प्रदूषण औष्णिक वीज केंद्रे, वाहने, आग आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे पसरते, हे लक्षात घेतले पाहिजे.

गेल्या काही वर्षात वाढते औद्योगिकरण, कचरा जाळणे आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे भारतात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत चालले आहे. राजधानी दिल्लीत तर दरवर्षी आणीबाणीची परिस्थिती उद्भवत आहे. अशा स्थितीत बालकांना केवळ श्वास घेण्यासच त्रास होतो असे नव्हे तर मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित आजारही वाढत आहेत. जीव गुदमरून टाकणार्‍या हवेमुळे सर्वच वयोगटातील नागरिकांना वेगवेगळे आजार जडत असून पुढच्या पिढीतील मृत्यूचे प्रमाण घाबरवून टाकणारे आहे. देशाचे भविष्य आजारांंनी घेरले आहे.

लहान मुलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढले असून त्याला कारणीभूत हवेतील घातक रसायने आणि विषारी वायूच आहेत. एवढेच नव्हे तर गर्भस्थ बाळाच्या आरोग्यावरही वायू प्रदूषणाचा घातक परिणाम होऊ लागला आहे. जन्मावेळीच काही विकृती असण्याच्या शक्यता वाढत आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये काम करणार्‍या ‘एअर एशिया’ नावाच्या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, दिल्लीतील नवजात अर्भकही अप्रत्यक्षपणे दररोज 15 सिगारेट ओढल्यावर शरीरात जाणार्‍या विषारी घटकांइतके प्रदूषण झेलत आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना श्वसनाशी संबंधित आजारांमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या भारतात सर्वाधिक असणे स्वाभाविक आहे.

भारतातील महानगरे प्रदूषणामुळे ग्रस्त आहेतच शिवाय आता तुलनेने लहान शहरे आणि खेड्यापाड्यांमध्येही प्रदूषणाचा विळखा आवळत चालला आहे. जगभरात वायू प्रदूषणाचा दुष्परिणाम मानवजातीवर सर्वाधिक झाल्याचे दिसून येते. याच कारणामुळे विषारी वायू आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे आणि मानवी आरोग्याचे नुकसान हा जगातील प्रथम प्राधान्याचा मुद्दा बनला आहे. आजमितीस हाच जगापुढील सर्वात मोठा धोकाही आहे. आपल्या देशाची स्थिती तर या बाबतीत अत्यंत चिंताजनक बनली आहे. पर्यावरण निर्देशांकात भारताचे स्थान 178 देशांच्या यादीत 155 वे आहे. प्रदूषणाच्या बाबतीत भारत ‘ब्रिक्स’ समूहातील देशांमध्येही सर्वात आघाडीवर आहे. पाकिस्तान, नेपाळ, चीन आणि श्रीलंकेतील स्थितीसुद्धा भारतापेक्षा चांगली आहे. पीएम-2.5 ची पातळी अर्थात अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण (फाईन पार्टिक्युलर मॅटर) पाटणा आणि नवी दिल्ली या दोन ठिकाणी जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे हीच दोन जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे ठरली आहेत.

काही दिवसांपूर्वीच ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेेंट’ (सीएसए) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात असा इशारा दिला होता की, जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये समाविष्ट असणार्‍या दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे. तरीसुद्धा चोवीस तास धूर ओकणारे कारखाने आणि रस्त्यांवरील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतच चालली आहे. शेतकर्‍यांकडून जमिनीतील पिकांचे बुडखे जाळण्याचे प्रकार असोत वा बेसुमार वृक्षतोड असो, यातील कोणतीही गोष्ट कमी होताना दिसत नाही. या बाबतीत एकटे सरकार काहीही करू शकत नाहीत. सर्वसामान्य लोकांची साथ आणि समजूतदारपणाची जोड त्यासाठी आवश्यक आहे. जीव गुदमरून टाकणार्‍या हवेमुळे भावी पिढी घातक आजार घेऊनच जन्माला येत आहे. देशाचे भवितव्य मानल्या जाणार्‍या मुलांना श्वासच घेता येत नसेल तर मामला गंभीर आहे.

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात विविध प्रकारच्या प्रदूषणांमध्ये वायू प्रदूषण ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. अकाली मृत्यूंचे प्रमाण जगभरात वाढत चालले आहे. त्यातील एक चतुर्थांश मृत्यूंचे प्रदूषण हेच कारण ठरले आहे. एवढेच नव्हे तर वाढत्या प्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढीचा धोकाही दिवसेंदिवस अधिक उग्र स्वरूप धारण करीत आहे. कारण वायू प्रदूषण आणि जलवायू परिवर्तन या बाबी परस्परांशी संलग्न आहेत. तसेच पर्यावरणातील नैसर्गिक घटक विषारी बनत चालले आहेत आणि जैवविविधतेला त्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.

अशा स्थितीत उद्योग, वाहने, कचरा व्यवस्थापन आणि घरगुती कारणांमुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने आणि सर्वच स्तरांवर प्रयत्न करणे अत्यावश्यक ठरते. यासंदर्भात योजले जाणारे उपाय ठोस, प्रभावी आणि उपयुक्त असायला हवेत. केवळ तोंडदेखले उपाय योजण्यात काहीच हशील नाही. आपल्या भोवतालात पेरला जात असलेला विषारी वायू हा चिंतेचा विषय असून आताच त्यावर उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. उशीर होण्यापूर्वीच आपण हातपाय हलवले नाहीत तर देशातील मनुष्यबळ आणि पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी होईल.
– डॉ. संतोष काळे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!