कोल्हार येथे बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

0

कोल्हार (वार्ताहर)- ऊसामध्ये दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मंजाबापू निबे (वय-77) या शेतकर्‍यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना कोल्हार बुद्रुक येथील निबे देवकर वस्तीनजिक शुक्रवारी भरदुपारी घडली. सुदैवाने यातून ते बचावले असले तरी जखमी झाले आहेत. माणसावर बिबट्याने हल्ला करण्याची कोल्हार भगवतीपूर परिसरातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे शेतकर्याांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून बिबट्याच्या बंदोबस्ताकरिता वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

 
मंजाबापू गंगाधर निबे यांची निबे देवकर वस्तीजवळ नगर मनमाड महामार्गानजिक वस्ती आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घराजवळच असलेल्या शेताकडे चालले होते. त्याचवेळी अगदी 10 फूट अंतरावर बिबट्या उसात लपून बसलेला त्यांना दिसला. दोघांची नजरानजर झाल्यानंतर बिबट्याने धाऊन जात त्यांच्या अंगावर झेप घेतली व पंजा मारुन चावा घेण्याचा प्रयत्न केला.

 

 

अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली व तेथून पळ काढला. तेवढ्यात बिबट्यानेही तेथून धूम ठोकत ऊसात लपून बसला. नजिकच असलेल्या घरातून इतरजण धावत आले. भरदुपारी हा प्रकार घडल्याने या भागात भितीचे सावट पसरले आहे. जखमी मंजाबापू निबे यांच्या हाताला, पायाला, हाताच्या बोटाला जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या प्राथमिक उपचार करुन लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

 

 

श्री. निबे सुखरुप असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या भागात आसपास दाट ऊसाचे शेतीक्षेत्र असल्याने बिबट्याला लपून बसण्यास अनुकूल जागा आहे. तो बिबट्या अजूनही ऊसातच लपून बसला असल्याने येथे तात्काळ पिंजरा बसविण्यासंदर्भात कोपरगांव वनविभागाशी संपर्क साधण्यात आला.

 

 

शनीवारी सकाळी पिंजरा लावला जाईल असे त्यांनी सांगितले. हल्ला करणारा बिबट्या जखमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सकाळी एका अज्ञात वाहनाने महामार्गावर त्यास धडक दिल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित बिबट्या जखमी असल्याने चवताळलेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*