कोल्हार भगवतीपूरचा आठवडे बाजार पहिल्यांदा बंद

0

कोल्हार (वार्ताहर)- संतापलेल्या शेतकर्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाची तीव्रता आणखी वाढली. शुक्रवारी कोल्हार भगवतीपूर तसेच कोल्हार खुर्दमध्ये ठिकठिकाणी शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे दिसले. या पार्श्‍वभूमीवर कोल्हार भगवतीपूर येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार चक्क कडकडीत बंद राहिला. दिवसभर बाजारतळावर शुकशुकाट राहिला. येथील आठवडे बाजार बंद राहण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

 
दर शुक्रवारी कोल्हार भगवतीपूर येथे आठवडे बाजार भरतो. परंतु शेतकरी संपामुळे काल सकाळी आडत व्यापार्‍यांचा मोंढा भरला नाही. तथा कोणत्याही शेतकर्‍याने शेतीमाल विक्रीकरिता आणला नाही. याखेरीज किरकोळ किराणा मालाची दुकाने, भेळ मिठाईची दुकाने, धान्य दुकाने थाटली नाहीत. दिवसभर बाजारतळावर शुकशुकाट राहिला. एवढेच नाहीतर भाजी मंडई देखील रिकामी होती. फळविक्रेत्यांनी रस्त्यावर थाटलेली दुकानेदेखील काढून घेतली.

 

त्यामुळे फळविक्रीदेखील बंद ठेवण्यात आली. एकंदरित भाजीपाला, फळे, धान्य, दूध पुरवठा आदींच्याबाबतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान सकाळी निबे, देवकर, नवाळे वस्तीजवळ शेतकर्‍यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध म्हणून दूध रस्त्यावर ओतले.

 

शेतकर्‍यांची अवहेलना करणार्‍या शासनाकडून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा दृढनिश्‍चय व्यक्त करण्यात आला. त्यासंदर्भात निवेदन लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पालीस निरीक्षक रणजित गलांडे यांना देण्यात आले. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच स्वप्निल निबे, भगवतीपूरचे उपसरपंच अशोक दातीर, राहुल निबे, प्रदीप निबे, सुधीर खर्डे, विजय निबे, सुनिल निबे, महेश राऊत, रविंद्र निबे आदी उपस्थित होते. कोल्हार खुर्द येथे देखील सकाळी नगर मनमाड महामार्ग रोखण्यात आला.

 

 

यावेळी भाजीपाला रस्त्यावर फेकून दूध ओतण्यात आले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचा शेतकर्‍यांच्या या संपाला पाठिंबा असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गुणवंत आठरे, कार्याध्यक्ष संजय दळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*