Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

कोल्हापूरच्या चिवटे आजींच इंटरनेटवर मराठीतून लेखन!

Share
नुकताच मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी साहित्यकार वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने निश्चित केले होते. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने काही तरी वेगळी माहिती मिळवून लिहिण्याचं ठरवलं. तेव्हा कोल्हापूरच्या 76 वय असलेल्या आजीबाई यांच्याविषयी इंटनेटच्या माध्यमातून माहिती मिळाली. विशेष म्हणजे या आजीबाई मोबाईल, लॅपटॉपच्या साहाय्याने फेसबुक, व्हॉटस्अप तसेच स्वत:चं एक ब्लॉग तयार केला आहे. त्यावर वेळेचा पूर्ण सदुपयोग करून नित्याने मराठीतून ब्लॉग लिहितात. मराठी दिनाच्या औचित्याने या आश्चर्यचकित करणार्‍या 76 वर्षीय ‘अ यंग लेडी नेटिझेन’ च्या ब्लॉग विषयीची चर्चा…

सर्वसाधारणपणे वयाची साठी ओलांडली म्हणजे मनुष्य रिटायर्ड होतो. अर्थात बौद्धिकरित्या कमकुवत होतो आणि पुढे ‘रिटायर्ड पर्सन’ म्हणून त्याला संबोधलं जातं. उतार वयामध्ये मनुष्य निष्क्रिय होतो (असा समज आहे) आणि म्हणून त्याच्या माथी रिटायर्टमेंटचा लेबल लावला जातो. परंतु मनाची इच्छाशक्ति असली की वयाची साठी असो की नव्वदी पार केलेली असो मनाच्या खंबीर आधारावर काहीही साध्य करता येऊ शकतं.

आजचा काळ हा सोशल मीडियाचा बोलबाला असलेला काळ आहे. सामान्यत: वाढत्या वयाची बहुतेक माणसं अशा साधनांपासून दोन हात लांबच राहतात. आधुनिक तंत्रज्ञानाशी जवळीक ठेवत नाहीत. मात्र याला अपवाद आहेत कोल्हापूरच्या वसुधा चिवटे ऊर्फ ब्लॉगवाल्या आजीबाई. वयाचे 76 वर्ष पार केले आहे तरी त्या इंटरनेट-कॉम्प्युटर-मोबाईल सहजपणे हाताळतात. इतकच काय त्यांनी स्वत:च ब्लॉग सुरु केला असून त्यावर त्या नियमितपणे मराठीतून लेखन करत असतात.

संदेशवहनाकरिता वेगवेगळी साधनं कालापरत्वे उदयास आली. टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट, इ-मेल्स, फेसबुक, व्हॉटसअप अशी हल्ली सर्वत्र संदेशवहनाची विविध साधनं उपलब्ध आहेत. व्यक्ति-व्यक्तिला इंटरनेटचं आकर्षण आहे. अगदी लहानांपासून अबावृद्धापर्यंत इंटरनेट-मोबाईलचे उपभोक्ते झालेत. परंतु कोल्हापूर येथील वसुधा चिवटे ज्यांना ‘अ यंग लेडी नेटिझेन’ म्हणता येईल त्यांनी स्वत:चा ब्लॉग तयार केला असून त्यावर त्या सहजपणे मराठीतून पोस्ट टाकत असतात. या चिवटे आजीबाई नुसतं ब्लॉगच लिहित नाही तर फेसबुक पेज ही ऑपरेट करतात हे विशेष. आजीबाईचा ब्लॉग म्हणजे विविध विषयांवर लेखन, विविध खाद्यपदार्थांच्या माहितीचा खजिनाच आहे.

श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे या मूळ कोल्हापूरच्याच. त्यांच संपूर्ण आयुष्य कोल्हापूरला गेले. मुलगा विदेशात स्थिरस्थावर झाला मात्र आजीबाईंनी कोल्हापूरलाच राहण पसंत केलं. विदेशातून आईशी संपर्क राहावा म्हणून त्यांच्या मुलाला कल्पना सुचली. कोल्हापूरला त्याने आईला म्हणजे चिवटे आजींना वेब कॅमेरा, कॉम्प्युटर आणि त्याला जोडून इंटरनेट कनेक्शन जोडून दिलं. ते कसं हाताळायचं हे ही आजीबाईंना सांगितलं. त्यांनी आपल्यापरीने ते शिकून घेतलं. आता विदेशात ऑनलाईन व्हिडिओ कॉल करू लागल्या.

इंटरनेटशी संबंधित सर्व बाबी जसे ई-मेल कसं करायचं वगैरे ते शिकून घेतलं. त्यामुळे आजीबाईंना क़ॉम्प्युटरमध्ये अधिक रस वाटू लागला. त्यांना इंग्रजी टाइप करता येऊ लागले. कॉम्प्युटरची काही मराठी, इंग्रजी पुस्तके वाचण्यासाठी त्यांना आणून दिले. ते वाचून त्या कॉम्प्युटरच्या इतर कामात निपुण झाल्या. गुगल ट्रान्सलेशनवर इंग्रजी लिहायचं, त्याचं भाषांतर मराठीत व्हायचं, मराठी लेखन देखील चिवटे आजी शिकल्या. नंतर मुलाने त्यांना मराठीतून टाइप करून लिहिण्या आग्रह केला. इंग्रजी की-बोडर्वर मराठी टाइप करायचं शिकलं. त्या इनस्क्रिप्टमध्ये उत्तमपैकी मराठी लेखन करू लागल्या. मानवी जीवनातील आवश्यक अनेक गोष्टींवर त्या लेखन करून त्या कॉम्प्युटरमध्ये जतन करून ठेवत असतं. सणवार असो की खाद्यपदार्थांची माहिती, स्वत: रेखाटलेल्या विविध रांगोळ्यांचे छायाचित्र आदि सगळ्यांच विषयावर त्यांच गहन लेखन करू लागल्या. पुढे आजीबाईंचा मुलगा पुष्कर भारतात आला तेव्हा त्याने ही जतन केलेली माहिती पाहिली व एक ब्लॉग सुरु करून त्यावर हे सगळं पोस्ट करायचं सागितलं. मग चिवटे आजींनी ‘वसुधालय’(हीींिीं:/र्/ींर्रीीवहरश्ररूर.ुेीविीशीी.लेा). नावाने ब्लॉग सुरु केला. ब्लॉगचे रिडर्स वाढू लागले. ब्ल़ॉगची लोकप्रियता दिवसागणिक वाढू लागली आणि वर्ष 2010 मध्ये सुरु केलेल्या या ब्लॉगचे आज तब्बल सहा लाखाहून अधिक वाचक आहेत. आजीबाईंचा मनमिळावू स्वभाव आहे. आमचे सहयोगी मित्र किशोर कुलकर्णी (के.के.) यांच्याशी त्यांचा संवाद झाला.

नुकतेच 15 फेब्रुवारी रोजी कुलकर्णीं यांचा वाढदिवस होता. म्हणून चिवटे आजींनी आग्रहाने त्यांना कोल्हापूर येथे आपल्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित केले. आपल्या परिवारासोबत त्यांनी के.केंचा वाढदिवस साजरा केला. अशा तर्‍हेने या नेटकरी आजीबाईंनी केंके.ची आवभगत केली. सोशल मीडियाचा योग्य वापर होऊ शकतो याचं उदाहरण चिवटे आजींनी आजच्या युवापिढीसमोर ठेवलं आहे. वाढत्या वयात मनुष्य नेहमी अशा कामांपासून स्वत:ला दूर ठेवतो. मात्र चिवटे आजींनी जिद्दीने काम करून तरुण-वृद्ध सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
मो. 9881057868
– आरिफ आसिफ शेख

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!