कोर्ट ऑर्डरने डॉक्टर कोमात! स्थगितीला नकार

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील हॉस्पिटलच्या नियमबाह्य इमारतीवर हातोडा टाकण्याचे काम महापालिकेने सुरूच ठेवावे. त्याला स्थगिती मिळणार नाही.

महिनभराची मुदत त्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने आज महापालिकेला दिली. महिनाभरातील कारवाईचा अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे कोर्टाने महापालिकेला बजावले.

कोर्टाच्या या ऑर्डरने शहरातील डॉक्टर कोमात गेले आहेत.
शहरातील नियमबाह्य हॉस्पिटलच्या इमारतीवर कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या गतवेळच्या सुनावणीत खंडपीठाने महापालिकेचे कान पिळून कारवाई करण्याचे बजावले होते. त्याचा अ‍ॅक्शन टेकन रिपोर्टही कोर्टाने मागविला होता.

आज गुरूवारी (दि.10) खंडपीठात त्यावर सुनावणी झाली. महापालिकेने पाच दिवसांत 17 हॉस्पिटलच्या इमारतीवर हातोडा टाकला आहे. यापुढील कारवाई सुरू राहिल असा रिपोर्ट कोर्टासमोर सादर केला.

त्यानंतर डॉक्टर संघटनेच्यावतीने अ‍ॅड विनायक दिक्षीत यांनी बाजू मांडली. महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र कोर्टाने ही मागणी विचारात घेतली नाही.

खंडपीठाने यापूर्वी केलेल्या आदेशात बदल करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत यापुढची कारवाई सुरू ठेवावी. नियमबाह्य हॉस्पिटलच्या कारवाईसाठी महापालिकेला महिनाभराची मुदत देण्यात येत असून पुढील सुनावणीवेळी केलेल्या कारवाईचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्ते शेख यांच्यावतीने अ‍ॅड. मुकुल कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

महापालिकेच्यावतीने अ‍ॅड. व्ही.एस.बेंद्रे यांनी काम पाहिले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे सुरेश इथापे यांच्यासह शहरातील डॉक्टर सुनावणीवेळी उपस्थित होते..

या हॉस्पिटलवर झाली कारवाई
डॉ. वानखेडे, डॉ. भास्कर जाधव, सिटी केअर (डॉक्टर सुराणा), डॉ. होडशीळ हॉस्पिटल (विराज कॉलनी), डॉ. सानप, डॉ. बागल नर्सिंग होम (विराज कॉलनी), डॉ. चेडे हॉस्पिटल, डॉ. शिरसाठ हॉस्पिटल, डॉ. कराळे हॉस्पिटल, लाईलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिंदे हॉस्पिटल (बुरूडगाव रोड), भागीरथी हॉस्पिटल, साई आर्य हॉस्पिटल (डॉ. सतीश राजूरकर, चाणक्य चौक), डॉ. गुंजाळ हॉस्पिटल (माणिकनगर), डॉ. सांगळे हॉस्पिटल (बुरूडगाव रोड), सुमांगल्य हॉस्पिटल (डॉ. चंगेडिया, चाणक्य चौक), डॉ. बेंद्रे हॉस्पिटल (देशमुखवाडी).

35 ठिकाणी पडणार घाव
शहरात 334 क्लिनीक व 150 हॉस्पिटलच्या इमारती आहेत. त्यातील केवळ दोन हॉस्पिटलच्या इमारती या नियमात बसतात. 121 हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावून त्यांची सुनावणी घेतली. त्यातील 52 हॉस्पिटलच्या इमारती या निमयबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यातील 17 हॉस्पिटलवर महापालिकेने पाच दिवसांत हातोडा टाकला. कोर्टाच्या आजच्या आदेशामुळे राहिलेल्या 35 हॉस्पिटलवर कारवाई करावीच लागणार आहे. पालिकेचा जेसीबी उद्यापासून या इमारतीवर घाव टाकणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

LEAVE A REPLY

*