कोपर्डीत निर्भयाला सामुहिक श्रध्दांजली

0

9 ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यव्यापी मूक मोर्चाचा निर्णय

कर्जत (प्रतिनिधी) – मानवतेला काळीमा फासणार्‍या कोपर्डीतील घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त श्रध्दांजली वाहण्यासाठी सामान्य नागरिकांसह राजकीय नेते, मराठा समाज बांधवांनी कोपर्डीत गर्दी केली. सर्वांनी एकत्रितपणे मृत तरुणीला श्रध्दांजली वाहिली. भैरवनाथ मंदीरामध्ये दुपारी एक वाजेच्या सुमारास ‘त्या’ घटनेचा निषेध करत श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी स्मारकाला विरोध करत भैय्युजी महाराजांचा पुतळा जाळला.
कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील निर्भया हत्याकांडाला आज गुरुवार (दि.13) रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. मानवी मनाचा थरकाप उडालेल्या ‘त्या’ घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. कर्जत तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी श्रध्दांजलीसाठी कोपर्डीत धाव घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र फाळके, संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, छावा संघटनेचे नाना जावळे, शिवप्रहारचे संजीव भोर उपस्थित होते.
तसेच मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्चामध्ये केलेल्या न्याय हक्काच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. उलट मराठा समाजाची हेळसांड सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर मुंबई आणि नाशिक येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार कोपर्डी येथे भैरवनाथ मंदिरामध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने श्रध्दांजली वाहिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचा आढावा मेळावा झाला. 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मराठा क्रांती महामूक मोर्चाची तयारी व पुढील दिशा याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
कोपर्डीतील पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं काय उभं राहू शकतं? असा सवाल करत संभाजी ब्रिगेडनं कोपर्डीत गुरूवारी सकाळी 11.45 वाजता अध्यत्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांच्या पुतळ्याचे दहन केले. भैय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीच्या निर्भयाचे स्मारक उभारण्यात आले आहे. निर्भयाचे स्मारक तयार करणे म्हणजे तिची अवहेलना करण्यासारखे आहे, असा दावा करत संभाजी ब्रिगेडने भैय्युजी महाराजांचा पुतळा जाळला. आंदोलनकर्ते संभाजी बिगे्रडचे प्रमुख राजेश परकाळे, टिळक भोस, गोरख दळवी, गणेश गायकवाड, राहूल नवले, निलेश तनपुरे, दत्ता भोसले, दिपक तनपुरे, दत्ता साठे यांना कर्जत पोलीसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

*