‘कोपर्डीचा’आज फैसला

0

राज्याचे लक्ष कडेकोट बंदोबस्त निकाल

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील बहुचर्चीत कोपर्डी अत्याचार व खून खटल्याचा आज शनिवार (दि.18) ला निकाल सुनावला जाणार आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेसह कटातील आरोपी संतोेष भवाळ व नितीन भैलुमे यास न्यायालय काय शिक्षा सुनावली जाणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016ला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थीनीवर अत्याचार तिला करुन ठार करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यात 58 मोर्चे निघून या राक्षसीकृत्याचा देशभर निषेध करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींनी कडक शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अ‍ॅड. निकम यांनी 31 साक्षीदार तपासले.

 

या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंंदे याच्यावर खूनाचा व अत्याचाराचा आरोप आहे. तर नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांच्यावर कटाच्या आरोप आहे. हे आरोप सिद्ध करण्यासाठी अ‍ॅड. निकम यांनी 24 मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सविस्तर युक्तीवाद करण्यात आला. तसेच तीनही आरोपीच्यावतीने 250 पेक्षा जास्त मुद्दे मांडण्यात आले आहे. सर्वांचे ठळक मुद्दे न्यायालयाने मागवून घेतले होते. न्यायालयातील युक्तीवाद व सादर केेलेले मुद्दे यावर न्यायालय आज दोष निश्‍चित करणार आहे.

 

 

कोपर्डी घटनेची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकीलांनी जातीचा विषय काढून घटनेला मोठे केल्याचा युक्तीवाद केला होता. तसेच राज्यभरात काढण्यात आलेल्या मोर्चामुळे नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना गुन्ह्यात गोवल्याचे म्हटले होते. मात्र, न्यायाधीश यांनी आरोपीच्या वकिलांना तंबी देत न्यायालयात अशा प्रकारचे वाक्य वापरण्यात येऊ नयेत. कायद्यानुसार व कागदांचा आधार घेऊन युक्तीवाद करावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक वकिलांनी आपापली बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व साक्षी, कागदपत्रे, सबळ पुरावे यांच्या आधारावर आज तीन जणांचा दोष निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे या घटनेत मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे यासह अन्य दोघांना कोणती शिक्षा होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

न्यायालयाच्या आवारात साऊंड सिस्टिम
कोपर्डीच्या आरोपींवर तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोपर्डी घटनेची धग अजूनही नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यायालयात गर्दी होऊ नये, तसेच उपस्थितांना न्यायालयाचा निकाल स्पष्टपणे ऐकता यावा, यासाठी न्यायालयाच्या आवारात साऊंड सिस्टिम लावण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयात कडेकोट बंदोबस्त
कोपर्डी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी झालेल्या प्रकार लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा न्यायालयात आज जाहीर होणार्‍या निकालासाठी पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. यात अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर अशोक थोरात हे बंदोबस्तात राहणार आहेत. यासाठी 4 साहय्यक पोलीस निरिक्षक, 75 पोलीस कर्मचारी, 10 महिला पोलीस कर्मचारी, 2 शिघ्र कृती दलाच्या तुकड्या, राज्य राखीव दाल, आरसीपी यांची प्रत्येक एक तुकडी तैनात राहणार आहे.

 

कोपर्डीला छावणीचे स्वरुप
कोपर्डीतील खटल्याच्या निकाल जाहीर झाल्यानंतर कोपर्डीमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे. कोपर्डीत कर्जतचे विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 साहय्यक पोलीस निरिक्षक, 63 पोलीस कर्मचारी 2 महिला पोलीस कर्मचारी, शिघ्रकृती दलाच्या 2 तुकड्या, राज्य राखीव दलाची 1 तुकडी तैनात राहणार आहे. यासह नियंत्रण कक्षात पोलीस बळ राखीव ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*