Type to search

ब्लॉग

कोण होणार पुण्याचा खासदार?

Share

पुण्याचा खासदार कोण होणार याविषयी चर्चांचे आखाडे रंगत आहेत. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुणे दौर्‍यावर आहेत. तापलेल्या राजकीय वातावरणाला ते काय फोडणी देतात ते पाहणे मजेचे ठरणार आहे.

रतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौर्‍यावर येत असून ते पुणे, शिरूर आणि मावळ या तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या लोकसभेच्या तयारीने आणि इच्छुकांमुळे पुण्याचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शहांच्या दौर्‍याने तापलेल्या राजकारणाला जास्तीची फोडणी मिळणार असून पुण्याचा खासदार कोण आणि कुठल्या पक्षाचा या चर्चेला उधाण येणार आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार शिरोळे, पालकमंत्री बापट आणि शहराध्यक्ष गोगावले इच्छुक आहेत. या तिघांनीही मेळाव्याच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. शिरोळे यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मेळाव्याचे निमंत्रण शक्तिप्रमुखांना दिले. भाजपने महापालिकेत बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बापट यांनी सर्वांना आगामी निवडणुकीच्या प्रचाराची झलक दाखवल्याची चर्चा आहे. प्रत्येक नगरसेवकाने ही निवडणूक स्वत:ची आहे, असे समजून काम केले पाहिजे. प्रत्येकाने सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी तसा चेहराच उरला नाही. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेससाठी तिकीट मिळण्याच्या आशेवर खर्ची केले मात्र पक्षाशी गद्दारी केली नाही असे अनेक निष्ठावंत आजही काँग्रेसकडे आहेत. मात्र कार्यकर्त्यांची जी फळी उभारण्याचे काम सुरेश कलमाडी यांनी केले होते तशी फळी उभारणे किंवा आहे ती साखळी घट्ट करण्याचे काम त्यानंतर कोणालाच जमले नाही. संघटन कौशल्याअभावी मागील निवडणुकीत काँग्रेसला चांगला उमेदवार देऊनही हार पत्करावी लागली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर खा. अनिल शिरोळे यांना साडेपाच लाखांवर मते मिळाली होती. एकूण मतांपैकी जवळपास 60 टक्के मते त्यांना मिळाली होती. तुलनेने काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना त्यांच्यापेक्षा जवळपास निम्मे मतदान झाले होते. एकूण मतदानाच्या 25 टक्के मते काँग्रेसला पडली होती. तिसर्‍या क्रमांकाची मते मनसेनेचे दीपक पायगुडे यांना पडली होती. त्याच्या आधीच्या निवडणुकीत म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश कलमाडी अनिल शिरोळे यांच्यापेक्षा केवळ 25 हजार मतांनी निवडून आले होते. या सर्व आकडेवारीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, पुण्यामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये फारसा फरक नव्हताच. मात्र गेल्या निवडणुकीत मोदी करिश्मा झाल्याने अनिल शिरोळे हे विक्रमी मतांनी निवडून आले.

पण आताची परिस्थिती वेगळी आहे. मोदी करिश्म्याला ओहोटी लागली, हे पाच राज्यांच्या निवडणुकांतून सिद्ध झालेले आहे. राहुल गांधीही पक्षीय राजकारणामध्ये हळूहळू का होईना प्रगतिपथावर आहेत. 5 पैकी 3 राज्यांच्या निवडणुकीत मिळालेले यश आणि प्रियंका गांधी यांचे सक्रिय राजकारणातील आगमन या दोन गोष्टींमुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असला तरीही प्रत्यक्ष पुण्यातील परिस्थिती मात्र काँग्रेससाठी पूरक नाही.

पुणे मतदारसंघामध्ये येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ या सर्वच ठिकाणी सध्या भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. मोदी लाटेने सगळ्याच पक्षांचे मैदान साफ करून टाकले. आता मात्र ती परिस्थिती राहिली नाही. काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती झाल्याने पुण्याची जागा काँग्रेसकडे राहणार हे स्पष्ट झाले आहे. मोहन जोशी, गाडगीळ, अभय छाजेड आदींची नावेही चर्चेत आहेत. इकडे भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट केंद्रात जाण्यासाठी उत्सुक आहेत. एकीकडे अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि भारतीय जनता पक्षाला नंतर बाहेरून पाठींबा देणारे संजय काकडेदेखील भारतीय जनता पक्षाने तिकीट देण्याची मनीषा बाळगून आहेत. त्यांना तिकीट नाकारले गेले तर ते कोणत्याही पक्षात जाऊन तिकीट घेऊ शकतात, हे त्यांच्या मागच्या हालचालींवरून स्पष्ट झाले आहे. असे झाले तर पुन्हा जर तरची नवी समीकरणे उदयास येतील.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, भाजप यांच्यामध्ये युती झाल्याने खरी लढत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोनच पक्षात पाहायला मिळेल. मनसेना अजून कशातच नाही. इतरही पक्ष आपले उमेदवार देतील. मतांची आकडेवारी जरी भाजपकडे झुकताना दिसत असली तरीही प्रत्यक्षात केंद्राच्या निर्णयांवर जनता जनार्दन नाराज आहेच. त्याचे पडसाद येत्या लोकसभा निवडणुकीवर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचा फायदा काँग्रेसला घेता येईल. मात्र काँग्रेसकडून यावेळी कोणता चेहरा येतो, त्यावरच सगळी लढाई अवलंबून आहे.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!