कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे?

0

देशातील नव्वद टक्के पोलीस आठ तासांपेक्षा अधिक काळ आपले कर्तव्य बजावतात. कामाच्या अतिताणामुळे थकवा येतो. तणाव वाढतो. जेवण वेळेवर न होणे, झोप पुरेशी न होणे आणि कुटुंबियांपासून अधिक काळ दूर राहणे याचे पोलिसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

सरकारी माहितीची विश्वासार्हता जनतेला शंकास्पद वाटते हे खरे! पण नोकरीच्या ठरलेल्या तासांपेक्षा पोलिसांना अधिक वेळ काम करावे लागते हे वास्तव कोण नाकारणार? दिवसाचे अनेक तास तणावपूर्ण परिस्थितीत त्यांना कर्तव्य बजवावे लागते. त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्याचा प्रयत्न अनेकदा केला गेला. सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांना केंद्र सरकारने तसे आदेशही दिले होते;

पण अंमलबजावणीअभावी अनेक चांगले सरकारी निर्णय व कायदे जसे निष्प्रभ ठरतात तसेच या आदेशांचेही झाले. आदेश बासनातच राहिले आणि पोलिसांची नोकरी आठ तासांपेक्षा जास्त चालूच आहे. पोलिसांना एवढे काम का करावे लागते? अनेक जण अनेक उद्देशाने पोलिसात भरती होतात. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना जास्त वेळ काम करावे लागते या कल्पनेला अनेक पैलू आहेत. ड्युटी संपल्यानंतरही गणवेशातच गावात फेरफटका मारणारे पोलीसही दिसतात. पोलीस व्यवस्था मजबूत नसेल तर कायदा-व्यवस्था धोक्यात येते तर कधी-कधी अतिकामाच्या हव्यासाने काही पोलीसच सुव्यवस्था धोक्यात आणतात, असेही किस्से मधून-मधून वाचावयास मिळतात.

अलीकडे अनेक गुन्ह्यांत पोलिसांचा सहभाग आढळतो. त्यांचे काम हेही जादा वेळेतील काम समजावे का? एक मात्र खरे! भारतात लोकशाही आहे तरी नेत्यांच्या अंगवळणी पडलेला सरंजामी लवाजमा मिरवण्याची हौस मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. नेत्यांचे अनुकरण करून सरकारी अधिकार्‍यांमध्येही वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत तो डामडौल हाडीमाशी मुरला आहे. कोणत्याही नेत्याचे वा अधिकार्‍यांचे दौरे त्या सरंजामाशिवाय का पार पडू नयेत?

ती एक सवय मोडली तर पोलिसांच्या जादा वेळेची तक्रार जवळ-जवळ संपुष्टात येईल. तथापि तो विचार सध्याच्या भारतीय लोकशाहीतील निवडून दिलेल्या जनसेवक नेत्यांना का सुचू नये? पोलिसांच्या आरोग्याची तोंडदेखली काळजी शब्दांतून व्यक्त करणारे पुढारी केवळ मिरवण्यासाठी आपल्या तैनातीला दिलेले पोलीस संरक्षण नाकारण्याचे सौजन्य दाखवतील का?

LEAVE A REPLY

*