Type to search

ब्लॉग

कोणाची मेहनत सार्थ ठरणार?

Share

40 डिग्रीपेक्षा अधिक तापमान असतानादेखील गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अमित शहा, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासहीत अनेक ज्येष्ठ, सेलिब्रेटी नेत्यांनी दिल्लीत प्रचार सभा घेतल्या. प्रियंका गांधींसहीत अनेक नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनासाठी रॅली काढल्या. कुणाची मेहनत सार्थ ठरणार ते 23 मे रोजी कळेलच.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिल्ली हे लहान राज्य आहे. हा किल्ला लहान दिसत असला तरी तो प्रतिष्ठेचा, महत्त्वाचा आणि मोक्याचा आहे. कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्लीतील राजकारण व निवडणुकीचा परिणाम आसपासच्या राज्यांवरही होत असतो. गेल्या सात वर्षांपूर्वीपर्यंत दिल्लीत काँग्रेस व भाजप (पूर्वीचा जनसंघ) या दोन प्रमुख पक्षांमध्येच निवडणुकीत लढाई असे. मात्र 2014 मध्ये आम आदमी पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आणि तेव्हापासून दिल्लीत, लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुकीत तिरंगी कुस्त्या सुरू झाल्या आहेत.

यावेळीही तेच चित्र आहे. फरक एवढाच आहे की 2014 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा काँग्रेस व भाजपला जो धाक होता तो आता राहिलेला नाही. उलट आपली जमीन टिकवण्याकरिता ‘आआपा’च्या केजरीवाल यांनी काँग्रेसलाच भाजपचा धाक घातला व त्या पक्षाबरोबर निवडणुकीत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसने दाद दिली नाही. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा हात धरून अस्तित्वात आलेल्या ‘आआपा’ने जातपात, धर्म निरपेक्षता या मुद्यांपेक्षा विजेचा दर, पाणी, भ्रष्टाचार इत्यादी सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित मुद्यांना उचलून धरीत दिल्लीच्या जनतेवर छाप पाडली. सर्वसामान्यांबरोबरच मध्यमवर्गीय, सुशिक्षित, बुद्धिवंत तसेच तरुण वर्गाने ‘आआपा’चा ‘झाडू’ उचलून धरला. मात्र गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारने अपेक्षित कामगिरी न बजावल्यामुळे ‘झाडू’ सफाई करण्याऐवजी ते कोपर्‍यातच राहणार का, अशी चर्चा आहे.

ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष दिल्लीत सत्तेवर आला त्याच पक्षाचे अनेक नेते गेल्या पाच वर्षांत करोडपती झाले आहेत. अनेकांविरुद्ध भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या केसेस चालू आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून आमदार, कार्यकर्ते पक्षापासून दूर जात आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 67 ‘आआपा’कडे असल्या तरी लोकसभेच्या येथील 7 जागा जिंकण्यासाठी त्या पुर्‍या पडणार नाहीत, याची जाणीव केजरीवाल यांना झाली असून दिल्लीचा एकुलता एक किल्ला आपल्याच हाती राखण्यासाठी त्यांना व पक्षाला आटापिटा करावा लागतो आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्षाने त्या 7 खासदारांपैकी उदित राज (उत्तर पश्चिम दिल्ली) व महेश गिरी (पूर्व दिल्ली) यांची तिकिटे कापली व त्यांच्या जागी अनुक्रमे प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस व माजी कसोटी क्रिकेटवीर गौतम गंभीर या सेलिब्रेटीजला उमेदवारी दिली आहे. जुन्या-नव्या चेहर्‍यांचा हा मेळ भाजपला यावेळी सातही जागा जिंकून देणार का? याची येथे उत्सुकता आहे.

दिल्लीच्या जनतेचा पुन्हा विश्वास संपादन करण्यासाठी व येथे परत आपला जम बसवण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांवर भरवसा ठेवला आहे. नाही म्हणायला दक्षिण दिल्ली येथे पक्षाने विजेंदरसिंग या सेलिब्रेटी ऑलिम्पिक मुष्टियोद्ध्याला उमेदवारी दिली आहे, तर आम आदमी पक्षाने तरुण उमेदवारांना प्राधान्य दिले असून या पक्षाच्या तीन उमेदवारांचे वय 40 पेक्षा कमी आहे. सुरक्षिततेचा अभाव ही दिल्लीतील सर्वात मोठी समस्या आहे. दिल्ली ही गुन्ह्यांची राजधानी म्हणून गौरवली (?) गेली आहे. चोर्‍या, दरोडे, घरफोड्या, चेनस्नॅचिंग, अपहरण, बलात्कार, हत्या हे प्रकार नित्याचेच आहेत. यासोबतच पाणी, स्वच्छता, कचरा व घाणीच्या डोंगरप्राय ढिगार्‍यांमुळे व अन्य कारणांमुळे होत असलेले प्रदूषण, दुर्गंधी आणि त्यामुळे होणारे आजार यामुळे दिल्लीकर त्रस्त, हैराण आहेत. हे सर्व प्रश्न सोडवतील त्यांना मते देऊ, असे मतदार सांगत असले तरी त्यांना तो भरवसा वाटत नाही.

याखेरीज प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पूर्व दिल्लीमध्ये मतदारांची संख्या सर्वात अधिक. कचर्‍यांचे ढिगारे, अस्वच्छता, ट्रॅफिक जॅम, उड्डाणपुलांची कमतरता, अतिक्रमणे, रस्त्यांची दुर्गती हे या मतदारसंघातील मोठे प्रश्न आहेत. भाजपने माजी कसोटी क्रिकेटवीर गौतम गंभीरला येथे राजकारणाच्या मैदानात उतरवले आहे. गंभीर हा अर्थमंत्री अरुण जेटली यांचा निकटवर्ती असल्याचे सांगतात. दिल्लीचे माजी मंत्री अरविंदरसिंग लवली (काँग्रेस) व आतिशी मार्लेना (आआपा) यांच्याविरुद्ध गंभीर कशी व किती फटकेबाजी करतो ते 23 मे रोजी समजेलच.
नवी दिल्ली व दिल्लीतील उच्चभ्रू व प्रतिष्ठेचा मतदारसंघ, विद्यमान खासदार मीनाक्षी लेखी (भाजप) यांना यावेळी लढायचे आहे ते माजी मंत्री अजय माकन (काँग्रेस) आणि ब्रृजेश गोयल यांच्याबरोबर.

यावेळी उत्तर-पूर्व दिल्लीतील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कारण येथे 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित (81) काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष असून भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यातील लढतीकडे दिल्लीचेच नव्हे तर देशाचेही लक्ष असेल. दिलीप पांडे हे येथे ‘आआपा’चे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार ब्राह्मण आहेत. मनोज तिवारी हे भोजपुरी गायक व अभिनेते आहेत. या मतदारसंघात उत्तर प्रदेश व बिहारमधून येथे आलेल्या स्थलांतरीतांचा भरणा अधिक आहे व त्यांच्या मतांवरच मनोज तिवारी व शीला दीक्षित यांची मदार आहे.

मुगल काळापासून प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणजे चांदणी चौक. गर्भश्रीमंत व्यापारी येथे गल्लोगल्ली सापडतात. परंतु याच बोळकांड्यांना दुकानांची व रस्त्यांची गर्दी, प्रदूषण, अस्वच्छतेमुळे बकालपणा आला आहे. लहान गल्ल्या व लहान लहान घरांमध्ये राहणारेही येथे खूप आहेत. व्यापारपेठेच्या या गजबजलेल्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन (भाजप), माजी खासदार जे. पी. अग्रवाल (काँग्रेस) व पंकज गुप्ता (आआपा) यांच्यातील त्रिकोणी लढत ही तीन वैश्य समाजाच्या प्रतिनिधींमधली लढत आहे. दक्षिण दिल्ली हा सधन व सुखवस्तू लोकांचा भाग. मात्र इतर मतदारसंघांप्रमाणे येथेही अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. रस्ते, पाणी, बगीचे, सार्वजनिक स्थळे यांचा व्यवस्थेबाबत येथील लोकांचा दक्षिण दिल्ली महापालिकेविरुद्ध सतत आरडाओरडा चालू असतो. डेंग्यू व मलेरियाचे याच भागात सर्वाधिक प्रमाण, हा येथला मोठा विरोधाभास आहे. 12 मे रोजी होणार्‍या निवडणुकीत येथील मतदार पुन्हा रमेश बिघुडी (भाजप) यांच्यावर विश्वास व्यक्त करणार की काँग्रेसचे बॉक्सर विजेंदरसिंग किंवा ‘आआपा’चे राघव चढ्ढा यांच्यावर मेहेरनजर करणार ते समजेलच. पश्चिम दिल्ली मतदारसंघात शहरी, सुखवस्तू, वस्त्यांबरोबरच देशाच्या फाळणीनंतर दिल्लीत आलेल्या पंजाबी भाषिकांचे प्रमाण अधिक आहे. जाटबहुल या मतदारसंघात खासदार प्रवेश शर्मा (भाजप) व बलबीर जाखड (आआपा) या दोन उमेदवारांविरुद्ध मातब्बर नेता महाबल मिश्रा (काँग्रेस) यांची लढत पाहायला मिळणार आहे.

उत्तर पश्चिम मतदारसंघात प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस यांच्यामार्फत भाजप निवडणूक जिंकू पाहत आहे. अकाली दल व काँग्रेसच्या रस्त्याने हंसराज हंस भाजपमध्ये पोहोचले आहेत. बाहेरचा उमेदवार येथे दिल्याबद्दल भाजपच्या एका गटात नाराजी आहे. मतदारांमध्येही राजेश लिलोठिया (काँग्रेस) आणि ‘आआपा’चे ज्येष्ठ नेता गुग्गन सिंह यांच्या बरोबरील सामन्यामध्ये मतदार पक्षाला महत्त्व देतात की उमेदवाराला प्राथमिकता देतात, हे बघू या. दिल्लीमध्ये काँग्रेस, भाजप व ‘आआपा’ या तिन्ही पक्षांनी जातीवर आधारितच तिकीटवाटप केले आहे. एकाही पक्षाने यावेळी येथे मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. आतापर्यंत दिल्लीत फक्त एकच केवळ सिकंदर बख्त (भाजप) हे मुस्लीम उमेदवार संसदेत निवडून गेले आहेत.

दिल्लीमध्ये 1 कोटी 43 लाख 23 हजार 458 मतदार आहेत. यापैकी पुरुष 77 लाख 50 हजार, महिला 63 लाख 50 हजार व 673 तृतीयपंथी मतदार आहेत. 90 पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 22 हजार 507 इतकी आहे. तरुण मतदार (18 ते 39 वर्षे) 75 लाख 51 हजार 507 इतके आहेत. यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय याच मतदारांच्या हाती आहे. यात सुमारे 53 टक्के युवक मतदारांचे मत ज्यांच्याकडे झुकेल त्या उमेदवारांचे भाग्य उजळेल. या मतदारांमध्ये मतदानाचा प्रथमच अधिकार बजावणार्‍यांची संख्या 2 लाख 54 हजार 723 इतकी आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी संस्कृती, प्रदेश व भाषिक लोक राहत असले तरी दिल्लीकर हा दिल्लीकरच असतो आणि नरेंद्र मोदी यांनी रामलिला मैदानावरील सभेत म्हटल्याप्रमाणे ‘दिल्ली है दिलवालों की’!
सुरेखा टाकसाळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!