केल्याने होत आहे रे…!

0

‘वर्ल्ड चिल्ड्रेन्स विनर्स गेम्स’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताच्या नऊ मुलांनी 22 पदके जिंकली आहेत. हा पराक्रम गाजवणार्‍यांनी कर्करोगाचा समूळ पराभव केला आहे. कर्करोगावर मात केलेल्या 9 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी या स्पर्धा भरवल्या जातात.

स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष होते. रशियातील मॉस्को येथे स्पर्धा पार पडल्या. टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘इम्पॅक्ट फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेने या मुलांना स्पर्धेसाठी पाठवले होते. बुद्धिबळ, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, धावणे अशा अनेक खेळांत या मुलांनी 16 देशांतील मुलांचे आव्हान समर्थपणे पेलले. ‘सततच्या पाठपुराव्यामुळे लहान मुलांमधील कर्करोग पूर्णत: बरा होतो’ हे प्रात्यक्षिकच या मुलांनी दाखवले आहे, असे मत टाटा मेमोरियलच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे.

देशात ‘रडतराऊ’ माणसांची संख्या कमी नाही. बहुसंख्य धडधाकट माणसे सतत कोणते ना कोणते रडगाणे गातच असतात. परिस्थितीवर करवादत असतात; पण या मुलांनी कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला हरवले आहे. साधारण चार-पाच तपांपूर्वी कर्करोग हे असाध्य दुखणे मानले जात होते; पण आरोग्यविषयक शास्त्रज्ञांनी सततच्या प्रयोगांतून कर्करोगावर बरेच नियंत्रण मिळवले आहे.

आता कर्करोग रुग्ण योग्य उपचार मिळाले तर रोगमुक्त होत आहेत. तरीही अजून ‘कर्करोग’ या शब्दाचा धसका सामान्य जनांना हादरवून टाकतो. असे रुग्ण मनाने आणि शरीराने खचतात. त्या रोगाशी संघर्ष करण्याची मानसिक तयारी तरुणवर्गात मात्र वाढली आहे. खेळ स्पर्धा सफल झालेल्या मुलांनी ते निश्चितच सिद्ध केले आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यावर योग्य व पुरेसे उपचार अजूनही सामान्यांच्या आटोक्यात नाहीत. निदान झाल्यापासून त्यावर मात करण्यापर्यंतचा काळ क्षणोक्षणी जगण्याची कसोटी पाहणारा असतो.

आर्थिक पाठबळही तितकेच महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर मॉस्कोतील स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व कर्करोगमुक्त मुलांनी असाध्य ते साध्य करून दाखवले आहे. कर्करुग्णांना मदत करण्यासाठी शासनाच्याही काही योजना असतील. तथापि व्यवस्थेतील ढिसाळवृत्ती अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण करीत असते. तेच काम खासगी सामाजिक संस्था उत्तम प्रकारे करू शकतात. स्पर्धांतील विजयी मुलांनी त्याचा प्रत्यय दिला आहे. या मुलांमध्ये तशी विजिगिषूवृत्ती निर्माण करणार्‍यांचे आणि देदीप्यमान यश मिळवणार्‍या मुलांचे अभिनंदन!

LEAVE A REPLY

*