केंद्र सरकारच्या स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धेसाठी गोदावरी अभियांत्रिकीच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

0

जळगाव, |  प्रतिनिधी :  केंद्र सरकारच्या उपक्रमातील स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार स्मार्ट इंडीया हॅकेथॉन ही स्पर्धा घेतली जात आहे.

केंद्रीय खात्यांमधील अडचणी, सुसुत्रता काम करण्याच्या पध्दती, त्यासंबंधीचे प्रश्‍न आणि उपाय या विषयावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यासाठी आयआयटीमार्फत निवडीचे निकषही ठरविण्यात आले होते. या स्पर्धेत देशातुन अभियांत्रिकीच्या  ७५०० संघांकडुन प्रश्‍नांसाठी उपाय आणि सल्ले मागविण्यात आले होते.

यातील १२०० संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात खान्देशातील गोदावरी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्यात इलेक्ट्रॉनिक्स विभागातील संघप्रमुख म्हणुन तरूण सिंग, विशाल देशपांडे, ऐश्वर्या कुळकर्णी, भारत तनवाणी आणि संगणक अभियांत्रिकीतुन दर्पण पाटील, विशाखा दांगडे यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय रस्ता परीवहन मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या पोटेन्शियल डिजीलॉक या समस्येसाठी उपाय म्हणुन सॉफ्टवेअर प्रणाली सुचविली होती.

या विद्यार्थ्यांना संगणक विभागप्रमुख प्रमोद गोसावी, व्ही.डी. चौधरी, अशफाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*