केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक झोपडपट्टींचे सर्वेक्षण होणार

0

नाशिक | दि.३ प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चार वर्गात स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांना मदत केली जाणार आहे. यात पहिल्या वर्गात महापालिकेकडून झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब कुटुंबांना स्वत:चे घर मिळावे म्हणून महापालिकेकडून त्या त्या झोपडपट्टीत जाऊन संबंधित कुटुंबांची माहिती अर्जात भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांनी महापालिका विभागीय कार्यालयात जाऊन गर्दी करू नये आणि आर्थिक फसवणूक करणार्‍यांना बळू पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

महापालिकेकडून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एका खासगी एजन्सीकडून शहरातील नोंद असलेल्या १६८ पैकी १४१ झोपडपट्टीत संबंधित कुटुंबांचा आणि नव्याने झालेल्या २५ पेक्षा अधिक झोपड्या असलेल्या झोपडपट्टींचे सर्वेक्षण केले जात आहे. हे काम सुरू झाले असून संबंधित एजन्सीचे लोक त्या-त्या झोपडपट्टी भागात जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेत घर देण्यासंदर्भातील फॉर्म भरून घेणार आहेत.

त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांनी महापालिका विभागीय कार्यालयात गर्दी करू नये, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत झोपडपट्टीशिवाय इतरत्र भाड्याने राहणारे आणि स्वत:चे घर नाही अशा कुटुंबियांना घर मिळावे म्हणून अशा कुटुंबांच्या मागणीनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिताच महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांत २० रुपये शुल्क असलेल्या फॉर्मची विक्री केली जात आहे.

सहा विभागांत महापालिका प्रशासनाने १६ हजार फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. हे फॉर्म झोपडपट्टीत राहणार्‍या कुटुंबांसाठी नसताना विभागीय कार्यालयावर झोपडपट्टीधारक गर्दी करीत आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांची फसवणूक होण्याची शक्यता असून वेळ वाया जाण्याचे प्रकार घडत आहेत.

त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांनी विभागीय कार्यालयावर गर्दी न करता जागेवर येणार्‍या महापालिका अधिकार्‍यांकडून फॉर्म भरून घ्यावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागणीनुसार सर्वेक्षणातील अर्ज विक्री येत्या ३१ मार्चपर्यंत केली जाणार आहे. त्यनंतर या अर्जाचे वर्गीकरण केले जाणार असून त्यानंतर विभागणी करून ही यादी शासनाला पाठवली जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेले चार घटक
१) जमिनीचा साधनसंपत्ती (संसाधन) म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे. यात १ जानेवारी २००० पूर्वीच्या झोपडपट्टीधारकांना ३० चौरस मीटर चटई क्षेत्रफळाचे घरकुल बांधून मिळेल.

२) कर्ज संलग्न व्याज अनुदान माध्यमातून आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणार्‍या घरांची निर्मिती करणे. यात कर्जपुरवठा करून व्याज अनुदान दिले जाणार आहे. यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी घराचे चटई क्षेत्र ३० चौ. मी. पर्यंत अपेक्षित असून अल्प उत्पन्न घटकांसाठी घराचे चटई क्षेत्र ६० चौ. मी. पर्यंत अपेक्षित आहे.

३) खासगी भागीदारीद्वारे परवडणार्‍या घरांची निर्मिती केली जाणार आहे. यात ३ लाख रुपये प्रतिवर्ष आर्थिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना असून यात केंद्र व राज्य शासनाकडून यातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. या घटकांसाठी घराचे चटई क्षेत्र ३० चौ. मीटरपर्यंत अनुज्ञेय राहणार आहे.

४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यात पात्र कुटुंबांना त्यांच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यास वैयक्तिक स्वरुपातीलअनुदान दिले जाणार आहे. यात केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळणार असून यात वाढीव बांधकाम मर्यादा ३० चौ. मीटरपर्यंत अनुज्ञेय राहणार आहे.

झोपडपट्ट्यांची स्थिती
महापालिकेकडे नोंद झालेल्या झोपडपट्ट्यांची संख्या १६८ असून यापैकी २९ झोपडपट्ट्यांंसाठी केंद्र शासनामार्फत महापालिकेने घरकुल योजना राबवली आहे. यातील बहुतांशी नागरिक घरकुलात राहण्यासाठी गेले आहेत. त्यानंतर शहरात नव्याने सुमारे २५ झोपडपट्ट्या वसल्या आहेत. १६८ झोपडपट्टीत २ लाख १४,७६९ इतकी लोकसंख्या राहत आहे.

मागणीनुसार फॉर्मची विक्री
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मागणीनुसार घरकुल सर्वेक्षणात सुरू झालेल्या फॉर्म विक्रीत दोन दिवसात ११ हजार ७९३ फॉर्म वितरित झाले आहेत. यात नाशिक पश्‍चिम २५७५, पंचवटी २४५४, नाशिक पूर्व २५००, नाशिकरोड १०००, सातपूर १८६५ व नवीन नाशिक १३९९ अशा फॉर्मची विक्री झाली आहे. अजूनही महापालिकेकडून २० हजार फॉर्म छापले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*